। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोंबडीच्या मागावर येत काही काळातच कोंबडी खाऊन बसलेल्या अजगराला खोपोलीतील अपघातग्रस्थांच्या मदतीसाठी संस्थेतील सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने गवतातून बाहेर काढत जीवदान दिले.
दुपारी एकच्या दरम्यान होनाड ग्रामपंचायत हद्दीतील चिंचवली गोहे येथील तानाजी पाटील यांच्या घरामागे कोंबड्या ओरडण्याचा मोठा आवाज आल्याने घरातील महिलांनी बाहेर जाऊन पाहिले असता एक मोठा अजगर कोंबडीला गिळत असताना निदर्शनास आल्याने तेथील महिलांनी घरारील वसंत पाटील यांना सांगितले असता पाटील यांनी अपघाताग्रस्थांच्या मदतीसाठी संस्थेचे सदस्य दिनेश पाटील यांच्याशी संपर्क साधत सर्पमित्रांना बोलाविण्याची विनंती केली.
काही वेळातच संस्थेचे सर्पमित्र दिनेश ओसवाल, गुरुनाथ साठेलकर, कृणाल पाटील आणि पाटील मॅडम हे चिंचवली गोहे येथे पोहचले आणि गवतात लपून बसलेल्या अजगराला कोणतीही दुखापत नकरता मोठ्या शिताफीने पकडले सुरुवातील हा अजगर आक्रमक पवित्र्यात असल्याने हाताशी येत नव्हता मात्र सर्पमित्रांनी अश्या परिस्थितीही काळजी घेत त्या आठ फुटी अजगराला पकडले.
यावेळी चिंचवली गोहे हे गाव जंगला लगत असल्याने मोठ्या प्रमाणात साप येत असतात त्यामध्ये अजगराचे प्रमाण जास्त आहे. रहिवासी परिसर गावालगत असल्याने खाद्याच्या शोधात ते गावात शिरतात. अशा सापांना कोणीही प्रशिक्षणाशिवाय पकडण्याचा प्रयत्न करू नये आणि त्वरित सर्पमित्रांना बोलवावे असे आवाहन सर्पमित्र गुरुनाथ साठेलकर यांनी केले. यावेळी ग्रामस्थांनीही आलेल्या सर्पमित्रांचे आभार मानले.