। अलिबाग I प्रतिनिधी ।
रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी 19 जुलै रोजी विदयुत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. विद्यूत खांब बदलण्या बरोबरच नवीन खांब बसवण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेताना ही कारवाई गोरेगाव येथे सायंकाळी केली.
गणेश तुकाराम पाचपोहे असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून तो मुळचा ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील वारले नगर येथील असून सध्या माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील चिंचवलीवाडी येथे राहत आहे.
तक्रारदार याच्या राहत्या घराजवळील विद्यूत खांब बदलून त्याजागी नवीन खांब बसवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी मधील माणगाव येथील गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश पाचपोहे यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. विद्यूत खांब बदल्यापासून नवीन खांब बसवण्या पर्यंत पाचपोहे यांच्याकडून टाळाटाळ होऊ लागली याबाबत तक्रारदार याने विचारणा केल्यावर मंगळवार 18 जुलै रोजी पाचपोहे याने सात हजार रुपयांची लाच मागितली.
लाचखोर अधिकाऱ्याच्या या कारभाराबाबत त्रस्त होऊन तक्रारदाराने रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शशीकांत पाडावे यांनी पडताळणी केली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, कौस्तूभ मगर, विवेक खंडागळे व पोलीस नाईक सचिन आटपाडकर या पथकाने बुधवारी सायंकाळी सापळा टाकून लाच घेताना रंगेहाथ पकडले.
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधावा , असे आवाहन पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाडावे यांनी केले आहे .