विनोद साबळे यांचे प्रतिपादन
। पनवेल । प्रतिनिधी ।
निवडणुका असो किंवा करोनासारख्या भयावह महामारीचे संकट असो. आपल्या प्रत्येक हाकेला साद देऊन मदतीसाठी धावून येणार्या उरण मतदार संघातील उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना भरघोस मतांनी निवडून आणणे आपले कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन मराठा महासंघाचे संघटन मंत्री विनोद साबळे यांनी केले आहे.
उरण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी वासांबे जि.प गटातील गावातून मतदाराच्या गाठीभेटी घेतल्या. यादरम्यान, रीस ग्रामस्थांशी संवाद साधताना विनोद साबळे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कोणत्याही पदावर कार्यरत नसतानादेखील प्रीतम म्हात्रे यांनी ग्रामस्थांना मोलाची मदत केली आहे. आपण वारकरी संप्रदायातील मंडळी आहोत. आपल्याला कुणी मदत केली तर आपण त्याच्याबद्दल उपकारांची जाण ठेवतो. ही भावना आपल्या मनात कायम वास करत असते. या निवडणुकीच्या निमीत्ताने या उपकाराची परतफेड करण्याची संधी चालून आली आहे. ही संधी आपण वाया घालणार नाही. तर, प्रीतम म्हात्रे यांना शंभर टक्के मतदान करून आघाडी मिलवून देऊ, असा विश्वास साबळे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना प्रीतम म्हात्रे म्हणाले की, आमचा परीवार सामाजिक सेवेच्या भावनेतून सतत काम करीत आहे. फक्त निवडणूकांवर डोळा ठेऊन आम्ही कधी काम केले नाही आणि करणार ही नाही. मात्र, आज आपल्या समाजसेवेला व्यापक अधिष्ठाण मिळावे यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरलो आहे. यामुळे भविष्यात अधिक चांगले काम करण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज असल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी युवा नेते शिवाजी काळे, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.