| मुंबई | प्रतिनिधी |
अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरात रविवारी (दि.02) 30 वर्षीय एका व्यक्तीने 17 वर्षीय मैत्रिणीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेत पीडित मुलगी 60टक्के भाजली असून, ती सध्या रुग्णालयात मृत्यूशी लढत आहे. पीडित मुलगी अंधेरी पूर्व परिसरातील रहिवासी असून, आरोपी देखील याच परिसरात राहतो. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघे गेल्या दीड वर्षांपासून एकत्र भेटत होते. स्थानिकांच्या तक्रारीनंतर, मुलीच्या आई-वडिलांनी तिला समज देत आरोपीला भेटणे थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपी संतापला आणि त्याच्या रागाच्या भरात मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 2 मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता आरोपी पीडित मुलीच्या घराबाहेर गेला आणि तिला बाहेर बोलावले. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला, ज्यामुळे आरोपीने तिच्यावर पेट्रोल टाकून आग लावली. आरोपीने तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा घृणास्पद कृत्य केला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. स्थानिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून मुलीला वाचवले. मुलीच्या पालकांनी त्वरित पोलिसांना कळवले आणि मुलीला कूपर रुग्णालयात दाखल केले. मुलीची प्रकृती गंभीर असून, ती सध्या मृत्यूशी लढत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर कठोर कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.