| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज मंगळवार (दि.4) पहाटे पाचच्या सुमारास एका केबल वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या आगीमुळे बोगद्यात काही काळ मोठ्या प्रमाणात धुर पसरला होता.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून ट्रक चालक राहुल जायप्रकाश यादव (27) रा. रोडपाली कळंबोली, मूळ रा. उत्तर प्रदेश हा ट्रक विशाखापट्टणम ते तळोजा येथे लोखंडी रिंगा घेऊन जात असताना. तो बोरघाटात नवीन बोगद्यात आला असता शॉर्टसर्किटमुळे आग लागली, मात्र या प्रचंड आगीमुळे बोगद्यात मोठया प्रमाणात धूर पसरला होता, त्यामुळे येथील काही वाहनात असलेलया प्रवाशांना तात्काळ बोगद्याबाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, प्रवाशांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. या घटनेची माहिती मिळताच, खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, आयआरबी यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल देवदूत यंत्रणा, खोपोली नगरापालिकेचे अग्निशमनदल आदी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात यश आले. मात्र, काही काळानंतर हायड्राच्या साहाय्याने ट्रक बोगद्यातुन बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.