| पुणे | प्रतिनिधी |
दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शहरातून एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिबवेवाडी भागात सोमवारी (दि.3) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. अपहरण झालेल्या हिरे व्यापाऱ्याच्या पत्नीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हिरे व्यापारी बिबवेवाडी भागातील एका सोसायटीत राहिला आहेत. ते हिरेजडीत दागिने करतात. सोमवारी सायंकाळी व्यापारी आणि त्यांची पत्नी मुलीला शाळेतून आणण्यासाठी सॅलिसबरी पार्क परिसरात गेले होते. शाळेतून घेतल्यानंतर मुलगी आणि पत्नीला घरी सोडले. काही कामानिमित्त लष्कर भागात जाणार असल्याचे सांगितले. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास व्यापाऱ्याच्या पत्नीच्या मोबाईलवर अपहरणकर्त्यांनी संपर्क केला. त्यांनी 2 कोटी रुपये मागितले आणि पैसे तयार ठेवण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या पत्नीने तातडीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पत्नीने पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.