अनंत गीते आदर्शवत लोकप्रतिनिधी

पेण तालुक्यातील वढाव, कासू येथील सभेत आ. जयंत पाटील यांच्याकडून गीतेंचे कौतुक

| पेण | प्रतिनिधी |

ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. कारण मोदींना जनता कंटाळली आहे. खताच्या पोत्याला 20 टक्के जीएसटी लावून सरकार 6000 ची गॅरंटी देते. पण 15 लाखाच्या गॅरंटीचे काय झाले? 400 शहर स्मार्ट होणार होती कुठे आहेत ती? गीतेंवर एक तरी भ्रष्टाचाराचा डाग आहे का? या भागातील रस्ते आणि अनेक विकासकामांची यादी खूप मोठी करता येईल. गीतेंकडे आदर्शवत लोकप्रतिनिधी म्हणून बघतो. आम्ही आयुष्यात कोणाला फसवले नाही. आम्ही तत्वनिष्ठ आहोत आणि म्हणूनच बिनशर्थ पाठिंबा दिला. हेच शेकापचे वैशिष्ट्य आहे असे सांगत आता तटकरेंच्या विरोधात का? याचा खुलासा अजूनही कुणाला करायचा असेल, त्यांनी आमंत्रण द्यावं. मी चर्चेसाठी येतो. स्वच्छ चारित्र्याच्या गीतेंना मते भरघोस द्या, असे आवाहन करत पेण तालुक्यातून गीतेंना सर्वाधिक मते मिळणार, असा विश्वास आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. कासू येथे इंडिया आघाडीची प्रचार बैठक शुक्रवारी (दि.12) रात्री उशिरा संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील, अतुल म्हात्रे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे, जि.प.सदस्य किशोर जैन, शेकाप पक्षाचे शिक्षण महर्षी पी.डी.पाटील, काँग्रेसचे अशोक मोकल, सेवा निवृत्त तहसिलदार सुभाष म्हात्रे, अविनाश म्हात्रे, शिवसेना तालुका अध्यक्ष जगदीश ठाकूर, मिहिर धारकर, अनंत पाटील, शेकाप वाशी सरपंच संदेश ठाकूर, विधानसभा समन्वय समीर म्हात्रे, रायगड जिल्हा संघटीका दिपश्री पोटफोडे, शेकाप पक्षाच्या स्मिता पाटील तसेच खारेपाट विभागातील कार्यकर्ते हजर होते.

यापुढे आ. जयंत पाटील म्हणाले की, तटकरे म्हणतात गीतेंचे एक तरी काम दाखवा, या विभागातील चाळीस गावांना मोफत पाणी जेएसब्लू कंपनी देते, हे गीतेंचे काम आहे. आता त्यांनी अंतिम ग्रामपंचायतला एक लाख रुपये आणून द्यावेत; आणि त्यांनी किती प्रकल्प आणले आणि नोकऱ्या दिल्या हे सांगावे, असा हल्लाबोल आ. जयंत पाटील यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, तटकरे यांनी फक्त एकच काम केलं ते म्हणजे कन्येला जि.प. अध्यक्ष, मुलाला आमदार आणि स्वतःला खासदार. मागे तटकरे यांना पुरोगामी म्हणून पाठिंबा दिला होता. मात्र सहा महिन्यात त्यांनी रंग बदलले आणि आमची फसवणूक केली. मला बोलायला मर्यादा आहेत; पण तरीही सांगतो 50 टक्के भूमिपुत्रांना जमिनी द्या, असा सुप्रीम कोर्टाचा कायदा आला. त्यामुळे आम्ही त्यासाठी लढतोय. आम्ही तिसऱ्या मुंबईत राहत असल्याने आम्हाला प्लॅनिंग कळाले पाहिजे. आम्हाला एफएसआय प्लॅन सांगा आणि मग आम्ही करार करु. एमएमआरडीए विकसित करत असलेल्या प्रदेशात आमच्या पाठीशी राहा, असे जाहीर निवेदन त्यांनी अनंत गीते यांना केले. आम्ही पनवेलचा नयना प्रकल्प हटवला, हे सांगतानाच एफएसआयचे गणित सांगत त्यांनी आम्हाला पेणला सुद्धा एका एकराला किमान शंभर कोटी हवेत; त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असेही ते यावेळी म्हणाले.

यापुढे अनंत गीते यांनी सांगितले की, लोकशाही संकटात आली तर विचार आणि मतस्वातंत्र्य जाणार. जिनपिंग आणि पुतीन यांच्यासारखे मोदींना मरेपर्यंत पंतप्रधान व्हायचे आहे. त्यामुळे विरोधी पक्ष मजबूत असेल तरच हुकूमशाही विरोधात लोकशाहीची ताकद वाढेल. या नव्या स्वातंत्र्य लढ्यासाठी देशातील 28 पक्ष एकत्र आले आहेत. या परिसरात कासूला पाणी परिषद झाली होती, त्यावेळी मी विष्णूभाईंना तुम्हाला रस्त्यावर उतरण्याची गरज नाही मी खासदार आहे, असे सांगून जेएसडब्ल्यूकडून लेखी हमी घेऊन 40 गावांना मोफत पाणी मिळवून दिले.चौपदरीकरणाला जमिनी मिळवताना सुद्धा खासदार मीच होतो. त्याचा पाचपट मोबदला नागरिकांना मिळवून दिला आहे; याचं चौपदरीकरणात पाणी लाईन शिफ्टिंग बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले तेंव्हा जेएसडब्लू कंपनीला खडसावून सांगत 90 कोटी खर्च करायला लावले. आता लाईन पूर्ण झाली की स्वच्छ पाणी येईल अशी मी ग्वाही देतो. मात्र त्यासाठी जनतेने खासदार करावे, अशी भावनिक साद त्यांनी लोकांना यावेळी घातली.

बकासुराला संपवायचे- अनंत गीते
भाजपचे 105 आमदार असताना शिवसेना फोडून 40 आमदार पळवले. त्यामुळे 145 चे बहुमत असताना राष्ट्रवादीचे आमदारसुद्धा पळवले; अजूनही भूक थांबली नाही मग काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांना नेले ही बकासुराची भूक थांबणार कधी? असा प्रश्न विचारत बकासुराची कथा सविस्तर सांगत रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी महाराष्ट्रातील बकासुराचा वारसदार संपवायला रायगडच्या जनतेतून भीम यायला हवा, असे आवाहन मतदारांना केले.
संविधान वाचविण्यासाठी एकत्र
आता आम्ही एकत्र का आता प्रश्न सर्वांना पडला असेल तर संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. राज्य सरकारवर 90 टक्के कर्मचारी नाराज आहेत. 2024 ला हे सरकार पुन्हा आले तर ही शेवटची निवडणूक समजा. नॉमिनेशन फॉर्म भरला तरी ईडी लागते. सीआरझेडमध्ये पोयनाड ते अलिबाग 5 हजार बंगले आहेत. त्यांना दंड लागू शकतो; नाहीतर कारवाई करून पाडता येऊ शकते. पण यात ईडी लावायचा संबंध काय? अनिल परब यांना अशीच इडी लागली. त्यामुळे पूर्वी जनता पक्ष जसा सत्तेविरुद्ध सर्वजण एकत्र आले होते, तसेच मोदी सरकार विरोधात इंडिया आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष एकत्र आले आहेत, असे आ.जयंत पाटील यांनी सांगितले. 

वढावमध्ये इंडिया आघाडीची सभा
सेझसारखे वादळ खारेपाटावर गोंगावत होते, तेव्हा तटकरे कुठे होते? त्यावेळेला खारेपाटातील शेतकरी तटकरेंना आठवले नाही का? प्रा. एन.डी.पाटील, ॲड.दत्ता पाटील, स्व. भाई मोहन पाटील यांनी या खारेपाटातून सेझ हद्दपार केला. परंतु सेझ यावा, म्हणून तटकरेंसारख्या दलालांनी प्रयत्न केला. त्यामुळे खारेपाटात पाय ठेवण्याचा नैतिक अधिकारही तटकरेंना नाही, असा घणाघात आ. जयंत पाटील यांनी केला. वाशी विभागातील वढाव येथे इंडिया आघाडीची प्रचार बैठक शुक्रवारी (दि.12) रात्री उशिरा संपन्न झाली. या बैठकीमध्ये खारेपाटावर तटकरेंनी कशाप्रकारे अन्याय केला, याचा पाढा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी वाचला.

यापुढे आ. जयंत पाटील म्हणाले की, आज तटकरे मतं मागायला येतात, त्यांना विचारा की, आमच्या सातबाऱ्यावरील बोजा कमी करणार का? सातबारे कोरे करून देणार का? देणार असलात तर आम्ही तुम्हाला मत टाकू. पण हा लबाड माणूस असं करणार नाही. हेटवण्याचे धरण हे खारेपाट दुपिकी व्हावे, या उद्देशाने बांधण्यात आले होते. यासाठी मोहन पाटील यांनी स्वतःची 200 एकर जमिन धरणासाठी फक्त 2000 रूपये भावाने दिली. जेणेकरुन धरण झाले तर खारेपाट दुपिकी होईल. हेटवण्याचा कालवा आमटेम, नागोठणे, अलिबाग तालुक्यातील कुर्डुस विभागात जाणार होता. परंतु तटकरे जलसंपदा मंत्री असताना एक फुट ही कालवा पुढे वाढला नाही. हे पाप तटकरेंचे आहे. जलसंपदा खात्याच्या या मंत्र्यांनी खारेपाटाचा विचार केला नाही.

पुढे ते म्हणाले मी नारायण नागू यांचा नातू आहे. ज्यांनी तत्कालीन ब्रिटीश शासनाशी लढून शेतकऱ्यांचा प्रदीर्घ संप यशस्वी केला. कुळकायद्याची मुहुर्तमेढ रोवली. तिसऱ्या मुंबईमध्ये खारेपाटातील शेतकरी भागीदार झालाच पाहिजे. आम्ही जमिनी विकणार नाही तर, एमएमआरडी प्रकल्पात भागीदार होऊ. येणारे सरकार हे आपले आहे आणि या सरकारमध्ये केंद्रिय मंत्री अनंत गीते असतील. त्यांना आपल्याला निवडून द्यायचे आहे, असेही शेवटी आ. जयंत पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version