| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायती मधील बोरगाव येथील अंगणवाडी केंद्र येथील बालकांना आरोग्य सुविधा देण्यात अडचणीचे ठरत आहे. तेथे वीज पुरवठा खंडित झालेला असल्याने अनेक बालके केंद्रात येण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. दरम्यान, एकात्मिक बालविकास विभागाने तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीत येणार्या बोरगांव गावातील अंगणवाडी केंद्रावर सुविधांचा अभाव दिसून येत आहे. बोरगांव गावातील अंगणवाडी केंद्रात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील 35-40 बालकांचा पट आहे. नियमितपणे बालके अंगणवाडी केंद्रावर पोषण आहारासाठी जास्त असतात. मात्र या केंद्रावर मागील एक वर्षांपासून विजेचे कनेक्शन तोडण्यात आले आहे. केंद्रात येणारी बालके ही वयाने लहान असल्याने त्यांना वीज आणि त्यानंतर पंख्यांची आवश्यकता असते. लहान बालकांना पंख्यांची सवय लागली असल्याने बोरगाव केंद्रात सुविधा मिळत नाही. यामुळे उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. बालकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.सप्टेंबर महिना अखेर आणि ऑक्टोबर येत असल्याने उन्हाचा उष्मामध्ये वाढ झाली आहे. पंख्यांची सुविधा नसल्याने या लहान बालकांना बसणे असह्य होत असल्याने बालके नियमित पणे येणे टाळत असतात. परिणामी लहान बालकांना त्रास सहन करावा लागतो.
कर्जत तालुक्यातील अनेक अंगणवाडी केंद्रावर समस्याचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. वीज जोडणी तोडण्यात आलेल्या अनेक अंगणवाडी केंद्र कर्जत तालुक्यात आहेत. त्याचा परिणाम बालकांची संख्या कमी होण्यावर देखील परिणाम होताना दिसत आहे. अंगणवाडी केंद्रामध्ये येणारी बालके ही प्रामुख्याने शाळेची सवय लागावी म्हणून आणि पोषण आहार घेण्यासाठी येत असतात. हे लक्षात घेवून एकात्मिक बालविकास विभागाने आपल्या सर्व केंद्रात वीज जोडण्या पूर्ववत कराव्या अशी मागणी करण्यात येत आहे.