स्थानिकांची मागणी
| माथेरान | वार्ताहर |
सन 1850 मध्ये ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सर ह्युज मॅलेट यांनी माथेरानचा शोध लावला त्यास जवळपास पावणेदोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. तरीसुद्धा याठिकाणी अद्याप विकासाच्या पाऊलखुणा या भूमीत उमटल्या नाहीत. पर्यटन वाढीच्यादृष्टीने महत्त्वाची वाहतुकीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासन आणि आजवरचे संबंधीत सर्वच तालुक्यातील लोकप्रतिनिधीसुध्दा मतांच्या राजकारणापायी हे अपयशी ठरले आहेत. नेरळ ते माथेरान ह्या एकमेव मार्गशिवाय अन्य पर्यायी व्यवस्था उपलब्ध झालेली नसल्याने इकडे खर्चिक पर्यटक येत नाहीत. त्यामुळेच इथलं पर्यटन अन्य स्थळांप्रमाणे बाराही महिने बहरत नाही. केवळ ठराविक सुट्टयांच्या भरवशावर इथला भूमिपुत्र आपल्या व्यवसायाची आर्थिक गणिते सोडविण्यासाठी तारेवरची कसरत करत आहे. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवजयंतीच्या दिवशी किल्ले शिवनेरीवर राज्यातील काही पर्यटनस्थळे विकसित करण्यात येणार असल्याचे आपल्या भाषणात म्हटले आहे. त्याप्रमाणे त्यांनी रायगड जिल्ह्यातील ह्या सुंदर स्थळाकडेसुध्दा जातीने लक्ष केंद्रित करून इथे पर्यायी सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. याकामी 21 एप्रिल 2023 रोजी माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माजी विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह प्रत्यक्ष भेट घेऊन दस्तुरी येथील वाहन कोंडी टाळण्यासाठी एम.पी. प्लॉट 93 हा नगरपरिषदेकडे हस्तांतरण करण्यात यावा त्याचबरोबर पनवेल-धोदाणी मार्गे माथेरान हा प्रस्तावित फिनिक्युलर रेल्वे प्रकल्प सुरू करावा जेणेकरून माथेरान हे पर्यटनस्थळ जगाच्या नकाशावर येईल आणि इथे पर्यटन क्रांती घडेल यासाठी निवेदन सादर केले होते.
धोदाणी ते माथेरान फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प मी नगराध्यक्ष असताना मार्गी लावला होता. एम.एम.आर.डी.ए.ने सुसाह्यता अहवाल तयार करण्यावर त्याकाळी (2008-2009) अंदाजे 75 लाख रुपये खर्च केले होते. त्याकरीता भारतीय रेल्वेच्या या संस्थेची नियुक्ती केली होती. त्यांचा अहवाल सकारात्मक आला होता. धोदाणी ते माथेरान फ्युनिक्युलर रेल्वे आहे असा अहवाल त्यांनी दिला. त्यानंतर मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. डिसेंबर 2010मध्ये अंदाजे 100 कोटी रुपयांची या रेल्वेची जागतिक निविदादेखील प्रसिद्ध केली होती.
निविदा जाहीर झाल्यानंतर काही नतद्रष्टांनी घाणेरडे राजकारण जोरात सुरु केले. कमिशनर वर दबाव आणला आणि निविदा रद्द करायला भाग पाडले. केवळ श्रेयवादापायी एक सुंदर प्रकल्प रद्द झाला. हा प्रकल्प करत असल्यामुळे मागील 14 वर्षात नक्की पुर्ण झाला असता. श्रेयवादात माथेरानकरांच पर्यायी मार्गाचे स्वप्न अर्धवट राहीले. हा रेल्वे प्रकल्प पुर्ण झाला असता तर पनवेल ते माथेरान हा प्रवास केवळ 30 मिनिटांचा झाला असता. पार्कींगची समस्याही राहीली नसती. 365 दिवस सर्वांना व्यवसाय मिळाला असता. केवळ आपल्याला श्रेय मिळणार नाही म्हणून माथेरानकरांना प्रगतीपासून दूर ठेवले गेले.
– मनोज खेडक, माजी नगराध्यक्ष
श्री मलंग गडाच्या धर्तीवर माथेरानचा प्रस्तावित फिनिकुलर रेल्वे हा प्रोजेक्ट शासनाने करायला पाहिजे. ज्यामुळे हजारो कुटूंबाला रोजगार निर्मिती होईल व माथेरानचे पर्यटन अधिक विकसित होईल.
– शिवाजी शिंदे, माजी विरोधी पक्षनेते माथेरान