। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील सरफळेवाडी येथील मिनी अंगणवाडी सेविका गिता उर्फ रश्मी रामदास सरफळे यांना तीन अपत्य असल्याने त्यांना अंगणवाडी सेविका या पदावरून कमी करण्यात यावे या मागणीसाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी रोहा यांच्याकडे तसेच वरीष्ठ कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. पण आजही संबंधित अंगणवाडी सेविका आपल्या पदावर कार्यरत असल्याने या अंगणवाडी सेविकेला नक्की कोणाचा वरदहस्त आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधीत अंगणवाडी सेविकेचे पती जामगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते व त्यांनी देखील तिसरे अपत्य जन्माला आल्यानंतर सरपंच पदाचा काही काळ उपभोग घेतल्याची माहिती देखील स्थानिकांनी दिली आहे. आपल्या तक्रारीच्या पुष्ट्यर्थ तक्रारदार यांनी सरफळे यांच्या तीनही अपत्यांचे जन्म दाखले तक्रार अर्जासोबत सादर केले होते.संबंधित अंगणवाडी सेविकेला 10/12/2008 रोजी प्रथम तर 23/10/2010 रोजी दुसरे अपत्य झाले होते. त्यानंतर 14/02/2017 रोजी तिसरे अपत्य झाल्याने तक्रारदार यांनी दिनांक 29/08/2019 रोजी तक्रार करून देखील केवळ चौकशीचा फार्स करण्यात आला.
संबंधित अंगणवाडी सेविका आज देखील कामावर कार्यरत असल्याने शासनाची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. तिसरे अपत्य झाल्यानंतर संबंधित अंगणवाडी सेविकेने स्वतःहून राजीनामा देणे गरजेचे होते. पण सदर बाब प्रशासनापासून लपवून ठेवत शासनाचे मानधन घेणार्या या अंगणवाडी सेविकेला तातडीने पदावरून कमी करून शासनाची फसवणूक करून घेतलेले मानधन वसूल करण्यात यावे अशी मागणी होत आहे. केवळ रोहा तालुक्यात तीन अपत्य असून देखील अंगणवाडी सेविका, मदतनीस म्हणून कार्यरत असणार्यांची संख्या दोन आकडी असून जिल्ह्यात हा आकडा शेकड्यात असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. याबाबत रोहा तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी यांना विचारणा केली असता सदर बाब न्यायप्रविष्ट आहे.याबाबतचा अहवाल आम्ही वरिष्ठ कार्यालयात सादर केला आहे असे सांगितले.