। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवसेना नेता अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरूद्ध आयपीसी 420 आणि 34 अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे.
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाल्यानंतरही रिसॉर्ट पाडण्यात आले नव्हते. त्यानंतर सोमय्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. जिल्हाधिकारी कार्यलयाकडून रिसॉर्ट पाडण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, दापोली पोलीस ठाण्यात रुपा दिघे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अनिल परब, सुरेश तुपे आणि अनंत कोळी यातिघांविरोधात भादंवि 34 आणि 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला. याची माहिती सोमय्या यांनी ट्विट करत दिली आहे.