| रसायनी | वार्ताहर |
अचानक कला क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा मोहोपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोपाडा येथील बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरीच्या पटांगणावर तीन दिवसीय प्रकाशझोतातील सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन माजी आ. मनोहर भोईर व मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धा रायगड ग्रामीण आणि शहरी विभाग अशा खेळविण्यात आल्या. तीन दिवस सुरु असलेल्या स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्यातील सात ते आठ हजार क्रीडाप्रेमी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून प्रकाश झोतातील सामन्यांचा मनमुराद आनंद घेतला. पहिल्या दिवशी वरद टॉवर रसायनी आणि प्रविण इलेव्हन वडघर तर दुसर्यादिवशी अंश इलेव्हन रसायनी आणि आई इलेव्हन ओवे संघाने उपांत्य फेरीत मजल मारली. यात अंतिम सामन्यात अंश इलेव्हन रसायनी आणि वरद टॉवर रसायनी यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यात अंश इलेव्हन रसायनी संघाने बाजी मारत प्रथम पारितोषिक रोख 2,00,000 रुपये व सुप्रिमो चषक पटकावला, तर व्दितीय 1,00,000 रुपये व सुप्रिमो चषक वरद टॉवर रसायनी संघाने पटकावला. तृतीय 50,000 व सुप्रिमो प्रविण इलेव्हन वडघर, चतुर्थ आई इलेव्हन ओवे संघाने पटकावला. या सामन्यात मॅन ऑफ दी सिरीजचा मान संदिप पाटील, उत्कृष्ट फलंदाज रजत मुंढे, उत्कृष्ट गोलंदाज संदेश मुंढे यांना मिळाला.