मालमत्ता कराविरोधात महामोर्चा

पालिकेला महाविकास आघाडीसह प्रकल्पग्रस्त समितीने विचारला जाब

| पनवेल | वार्ताहर |

मालमत्ता कराच्या विरोधात वारंवार आंदोलन करूनही पनवेल महापालिका प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समिती आणि महाविकास आघाडी पनवेल, उरणच्यावतीने गुरुवारी (दि. 5) महामोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाची सुरुवात खांदा कॉलनी सिग्नल येथून मुंबई-पुणे महामार्गावरून पनवेलमध्ये पायी चालत जाऊन महापालिका मुख्यालयापर्यंत अशी झाली. हा मोर्चा पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समितीच्यावतीने अध्यक्ष विजय गडगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेसचे पनवेल अध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख विश्‍वास पेटकर, संजय घरत, भूषण पाटील, हेमराज म्हात्रे, मा.नगरसेवक गणेश कडू, नंदराज मुंगाजी, कॅ. कलावंत, सुनीत पाटील, राजा केणी, सुधाकर पाटील, यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व महिला या मोर्चात भर उन्हामध्ये सहभागी झाल्या होत्या.

झोपलेल्या पनवेल महानगरपालिकेला जागे करण्यासाठी थाळीनाद करत घोषणासुद्धा देण्यात आल्या. त्यांनतर पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शेट्ये यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन ग्रामस्थांच्या भावना त्यांच्या समोर मांडल्या. यावेळी शेट्ये यांनी शिष्टमंडळाला महानगरपालिकेकडून मालमत्ता कराबाबत पडताळणी करून एक महिन्यात कळवू, असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाच्या निमित्ताने ठोस पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Exit mobile version