पंजाब स्पर्धेत 2 सुवर्णपदके
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
लव्हली प्रोफैशनल युनिव्हर्सिटी, पंजाब येथे इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनने आयोजित केलेल्या ज्युनिअर आणि सिनियर वयोगटातील 5व्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट फेडरेशन कप स्पर्धेत महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट संघातून 19 खेळाडूंनी भाग घेऊन नेत्रदीपक कामगिरी केली.
यामध्ये अनुज सरनाईक याने 85 ते 90 वजनी गटात पंजाब, तामिळनाडू, राजस्थान आणि अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशच्या खेळाडूला हरवून सुवर्णपदक पटकावले. त्याचे प्रमाणे रेगु (ग्रुप इव्हेंट) मध्ये सुद्धा अनुज सरनाईक त्याच्या सोबत ओमकार अभंग आणि साहिल बोटे यांनी महाराष्ट्रासाठी सांघिक सुवर्ण पदक पटकावले. या दैदिप्यमान कामगिरीचे सर्वत्र कौतुक होते आहे.
विजयी खेळाडूंना किशोर येवले अध्यक्ष इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा प्रकार असून टॅडिंग (फाईट), तुंगल (सिंगल काता), रेगू (ग्रुप काता), गंडा (डेमो फाईट), सोलो (इव्हेंट) या पाच प्रकारत खेळला जातो. या स्पर्धेत विविध राज्यातील 450 खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्याच्या पिंच्याक सिलॅट संघाची गेल्या 11 वर्षा पासून उत्कृष्ट कामगिरी असून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके मिळवून संघ अव्वल स्थानी आहे. या खेळामध्ये अनेक खेळाडूंना आपले भविष्य घडविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्रातील विजयी खेळाडूंचे अभिनंदन इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेद्र प्रताप सिंग, खजिनदार मुकेश सोनवाणे, अॅड.पी.सी पाटील, सुरेखा येवले, अॅड.विशाल सिंग, संदिप पाटील, संजीव वरे, प्रशांत पाटील, तृप्ती बनसोडे, प्रदिप मोहिते, शशी ठाकूर यांनी केले. विजयी खेळाडूंची निवड काठमांडू, नेपाळ येथे होणार्या साऊथ ऐशीयन पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशीप, ज्युनिअर आणि सिनियर स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.