रस्ता रुंदीकरणासाठी खोट्या सह्यांचा अर्ज

रहिवाशांची थेट नगरपरिषदेत धडक; नव्याने अर्ज सादर

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत नगरपरिषद हद्दीतील विठ्ठल नगर परिसरात अंतर्गत रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या भागातील सुमारे 58 रहिवाशांनी नगरपरिषदेकडे निवेदन सादर करत या प्रस्तावाला कडाडून विरोध नोंदवला असून, या प्रकरणात खोट्या सह्या घेऊन दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

विठ्ठल नगर परिसरातील विद्यमान 6 मीटरचा रस्ता 9 मीटर करण्यात यावा, असा अर्ज नगरपरिषदेकडे काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. या अर्जाबाबत रहिवाशांनी माहिती अधिकारातून प्रत मिळवली असता आश्चर्याचा धक्का बसला. कारण, या अर्जावरील अनेक स्वाक्षऱ्या आपल्या नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आम्ही असा कोणताही अर्ज दिला नाही, तसेच कोणत्याही रुंदीकरणास सहमती दर्शविली नाही, असे स्पष्ट करत या अर्जामागे स्वार्थी हेतू असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. विठ्ठल नगर परिसरातील रस्ता हा फक्त अंतर्गत रस्ता असून पुढे कृषी संशोधन केंद्राची जागा आणि गटार असल्याने हा रस्ता ‌‘डेड एंड’ वर जातो. दुसऱ्या बाजूसही सत्यम अपार्टमेंटजवळ रस्ता संपतो. त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न येथे निर्माण होत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत 9 मीटर रस्त्याची गरजच काय? असा सवाल ते उपस्थित करत आहेत. तसेच, या रस्त्यावर वाहने उभी असली तरीही वाहतुकीला फारसा अडथळा येत नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

तसेच, येथील एका विकासकाच्या फायद्यासाठी रहिवाशांच्या खोट्या सह्या करून रस्त्याचे रूंदीकरण केले जात असून त्यात भाजपच्या नेत्याचा हस्तक्षेप असल्याचा आरोप देखील रहिवाशांमधून होत आहे. मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना रहिवाशांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी आपल्या हरकतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून खोट्या अर्जाला मान्यता न देण्याची मागणी केली आहे. नगरपरिषद प्रशासन यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, पुढील काही दिवसांत कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

भाजप नेत्याचा हस्तक्षेप
रहिवाशांचा आरोप आहे की, येथील एका विकासकाला बांधकामासाठी अधिक मजले उभारण्याकरिता अतिरिक्त एफएसआयची आवश्यकता आहे. त्यासाठी रस्ता रुंदीकरणाचा मुद्दा पुढे रेटला जात असून, त्याच्याच फायद्यासाठी हा अर्ज खोट्या सह्यांवर आधारित करून नगरपरिषदेत जमा करण्यात आला आहे. या विकासकामध्ये स्थानिक भाजप नेते सुनील गोगटे भागीदार असल्याने या प्रकरणात त्यांचाच हस्तक्षेप असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. याबाबत सुनील गोगटे यांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

विकासकाच्या फायद्यासाठी येथील रहिवाशांच्या खोट्या सह्या अर्जावर करण्यात आल्या आहेत. कर्जत नगर परिषदेने यावर कोणतीही कारवाई केली नाही तर वेळप्रसंगी आंदोलन किंवा गुन्हा दाखल करण्याची आमची तयारी आहे.

राजेंद्र वैशंपायन,
रहिवाशी

Exit mobile version