राजिपच्या अंतिम आराखड्यास मंजुरी

स्वच्छता, पाणीपुरवठा कामांवर विशेष भर

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेची विशेष सभा सोमवारी (दि.18) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राजिपचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत 15व्या वित्त आयोगांतर्गत 2025-26 या वर्षाकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांना वाटप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अंतिम आराखड्यास उपस्थित सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीच्या सभापतींच्या अनुमोदनानंतर मंजुरी देण्यात आली.

ग्रामविकास विभागाकडून 2022-23, 2023-24, 2024-25 व 2025-26 या वर्षातील 15व्या वित्त आयोगाचा एकूण 52 कोटी 72 लाख 80 हजार 990 रुपये निधी रायगड जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. राजिपचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, अर्थ सभापती चंद्रकांत कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली वित्त विभागाने प्राप्त बंधित व अबंधित अनुदानातून करावयाच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला होता. 15व्या वित्त आयोगांतर्गत मिळालेल्या निधीपैकी 30 टक्के निधी हा स्वच्छता, 30 टक्के निधी हा पाणीपुरवठा व उर्वरित 40 टक्के निधी हा इतर मूलभूत कामांसाठी वापरण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. या आराखड्याला उपस्थित सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापतींनी अनुमोदन दिल्यानंतर अंतिम मंजुरी देण्यात आली.

15व्या वित्त आयोगाचा 52 कोटी 72 लाख 80 हजार निधी आला असून, त्यातून विविध कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्वच्छता व पाणीपुरवठा याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतर कामेही वेगाने होतील.

मंगेश वाकडीकर,
अध्यक्ष, राजिप

15व्या वित्त आयोगाचा चार वर्षांचा निधी एकत्रितपणे आता देण्यात आला आहे. या निधीअंतर्गत विविध कामे करण्याचा आराखडा आम्ही तयार केला असून, सभागृहाने त्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता विकासकामांना गती येणार असून, सर्वांना समान्य न्यायाने निधीचे वितरण करण्यात येणार आहे.

चंद्रकांत कळंबे,
अर्थ सभापती, राजिप
Exit mobile version