सोशल मीडियावरील दाव्यांवर संभ्रम; हवामान विभागाचा खुलासा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून, उन्हाचे तीव्र चटके नागरिकांना जाणवत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे नागरिकांना टाळावेसे वाटत आहे. अशातच सोशल मीडियावर “पुढील बारा दिवस अत्यंत धोक्याचे असून, 12 मेपर्यंत तापमान 45 ते 55 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार” असा संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत घराबाहेर पडू नये, असा इशाराही या संदेशांमधून दिला जात आहे.
मात्र, या व्हायरल संदेशांबाबत अधिकृत स्तरावर स्पष्टता देताना, आठवडाभरात तापमानात कोणतीही लक्षणीय वाढ होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला असता, 1 ते 4 मे या कालावधीत तापमान स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 4 मेपर्यंत रायगड जिल्ह्यासाठी ‘ग्रीन अलर्ट’ जारी करण्यात आला असून, कोणताही गंभीर तापमानाचा धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील पर्यावरणीय बदलांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाल्याने रस्त्यांवरील सावली कमी झाली आहे. विविध उपक्रमांतून लावण्यात आलेली झाडेही नष्ट होत असल्याचे चित्र आहे. त्यातच वणव्यांच्या घटनांमुळे जंगलांमध्ये आगी लागून पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. झाडांची घटती संख्या आणि वाढत्या आगीमुळे वातावरणात मोठे बदल होत असून, त्याचा परिणाम मानवी जीवनावरही होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमान 32 ते 42 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे. या पार्श्वभूमीवर तापमानात मोठी वाढ होणार असल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत असले, तरी अधिकृत यंत्रणांनी त्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे. तसेच मे महिन्यात उष्णतेचा प्रभाव वाढत असल्याने अत्यावश्यक कामांशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी.






