अलिबागसह महाड, पेण आगारात 15 एसटी बस
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्हयातील आगारात जून्याच एसटी बस असल्याची ओरड कायमच राहिली आहे. प्रवासी वर्गातदेखील या जुन्या एसटीबद्दल नाराजी निर्माण झाली होती. आता मात्र हा संताप थांबणार आहे. जिल्ह्यात 15 नव्या एसटी बसेस दाखल झाल्या आहेत. सुरुवातीला अलिबाग, पेण व महाड आगारात प्रत्येकी पाच एसटी बस देण्यात आल्या आहेत. रायगड एसटी प्रेमींच्या मागणीची दखल घेत शासनाने नव्या एसटी बसेस दिल्या आहेत.
एसटी महामंडळ रायगड विभागाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, महाड, माणगाव व श्रीवर्धन ही सात एसटी बस आगार आहेत. जिल्ह्यात 19हून अधिक एसटी बस स्थानके असून 439 एसटी बसेस आहेत. त्यात 260 सीएनजी बसचा समावेश आहे. अलिबागसह पेण आगारात सीएनजीवर चालणारी एसटी बसेस आहेत. दरम्यान, एसटीतून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र, जून्याच गाड्यांच्या भरोवश्यावर जिल्ह्याचा कारभार चालत असल्यामुळे जून्या गाड्यांतून प्रवास करताना प्रवाशांना त्रास होत होता.
रायगड एसटी प्रेमींनी प्रवाशांची ही समस्या ओळखून परिवहन मंत्री यांची भेट घेतली. जिल्ह्यात नव्या एसटी बसेस देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली होती. अखेर या मागणीची दखल घेत शासनाकडून रायगड जिल्ह्यात 15 एसटी बसेस देण्यात आल्या आहेत. अलिबाग, महाड व पेण आगारात प्रत्येकी 5 एसटी बस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता 454 इतक्या एसटी बसेस असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
अशी आहे नवी लालपरी
नवी एसटी बस लाल रंगाची असून 41 प्रवासी बसतील अशी आसन व्यवस्था आहे. प्रत्येक आसनाच्या बाजूला मोबाईल चार्जिंगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. आधुनिक पद्धतीची असलेल्या या एसटी बसमध्ये वैद्यकिय व सुरक्षेच्या दृष्टीने सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग पेण व महाड आगारात प्रत्येकी 5 एसटी बसेस दाखल झाल्या आहेत. प्रत्येक आगारात 10 एसटी बस शासनाकडून देण्यात येणार आहेत.
दिपक घोडे, विभाग नियंत्रक, रायगड