आगरी समाज संस्थेचा पुढाकार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाच्या आगरी समाज संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत शालेय पुस्तक योजना सुरु केली आहे. शालेय पुस्तकांचा आधार इतर गरजू विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी पुस्तक आदान प्रदान हा नाविन्य उपक्रम सुरु करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने हा उपक्रम संस्थेने सुरु केला आहे. परीक्षा झाल्यानंतर पुस्तके रद्दीत जाऊ नयेत म्हणून संस्थेतर्फे एक प्रयत्न करण्यात आला आहे.
एक सशक्त आगरी समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने अलिबाग आगरी सामाजिक संघटनेची स्थापना समाजातील काही नोकरदार आणि व्यावसायिक लोकांनी एकत्र येऊन केली आहे. अलिबागमध्ये उच्च दर्जाच्या आगरी समाज सभागृहाची निर्मिती आणि तरुणांना व्यवसाय आणि रोजगारासाठी जागरूक करून संधी उपलब्ध करून देणे ही प्रमुख उद्दिष्टे संस्थापकांनी ठेवली आहेत. ही संस्था नोंदणीकृत झाल्यानंतर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सभासद नोंदणीला सुरुवात झाली. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुलभा नरेश पाटील (78) या संस्थेच्या पहिल्या आजीव सभासद झाल्या.
त्यासोबतच संस्थेचा पहिला उपक्रम शालेय पुस्तक योजना जाहीर केली गेली. विद्यार्थ्यांच्या शालेय परिक्षा लवकरच संपतील त्यामुळे शालेय पुस्तके एकतर रद्दीत दिली जातील किंवा बुक स्टॉलवर विकली जातील.परंतु, एकमेकांची पुस्तके आदलाबदली केली तर आपली पुस्तके कोणाला तरी कामाला येतील आणि पाहिजे असलेली पुस्तके उपलब्ध झाली तर ती देखील मिळून जातील. त्यामुळे पालकांना होणारा शैक्षणिक भुर्दंड काही प्रमाणात कमी होईल. नकळत निसर्गाचे संवर्धनसुद्धा होईल, असा उद्देश आगरी समाज संस्थेचा आहे.
आपल्याजवळ जी शालेय पुस्तके आहेत ती कलेक्शन सेंटरमध्ये जमा करावीत. तसेच, जी पुस्तके विद्यार्थ्यांना हवी आहेत, त्यांची यादी व्हॉट्स अॅपवर किंवा फॉर्म भरून द्या. त्यानुसार मागणीची संस्थेला पूर्तता करता येईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष निलेश पाटील (9527308133), उपाध्यक्ष सुनिल तांबडकर (9822603856), सचिव प्रभाकर ठाकूर (9850297599) आणि मनोहर पाटील (8329697636) यांनी दिली आहे.