कांद्याचे दराने जनतेच्या डोळ्यात पाणी; घाऊक बाजारात भाव 45 रुपयांवर
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेलच्या घाऊक कांदा-बटाटा बाजारात कांद्याच्या भावाने अचानक उसळी घेतल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. काही दिवसांपूर्वी 18 ते 20 रुपये किलो असलेला कांदा आता थेट 45 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे नवीन कांद्याची आवक लांबणीवर पडत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे बाजारातील उपलब्ध कांद्यावर मागणीचा ताण वाढला आहे. त्यातच महाराष्ट्रातून कांद्याची मोठ्या प्रमाणावर बाहेरील राज्यांमध्ये वाहतूक सुरू आहे.
विशेषतः मद्राससह दक्षिणेकडील बाजारपेठांमध्ये कांद्याला मागणी वाढल्याने स्थानिक बाजारावरही परिणाम होत आहे. सणासुदीचे दिवस जवळ आले असतानाच कांद्याच्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. भाजीपाला खरेदी करताना गृहिणींना कांद्याचा भाव विचारूनच खरेदी करावी लागत आहे. कांद्याचा दर वाढल्याने दररोजच्या स्वयंपाकाचा खर्च वाढला आहे. काही कुटुंबांनी कांद्याचा वापर कमी करण्यास सुरुवात केली आहे. तर काहींच्या स्वयंपाकघरातून कांदा हळूहळू बाहेर जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.
कांदा हा रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक असल्याने त्याच्या दरवाढीचा थेट परिणाम घरगुती अर्थसंकल्पावर होत आहे. नवीन कांद्याची आवक वाढेपर्यंत दर आणखी किती वाढणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. पावसामुळे नवीन कांद्याच्या उत्पादनावर आणि काढणीवर परिणाम झाल्यास बाजारातील तुटवडा आणखी जाणवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बाहेरील बाजारपेठांमध्ये मागणी वाढल्याने स्थानिक बाजारातील आवक आणि दर यांचे गणित बदलले आहे. घाऊक बाजारातील दरवाढीचा परिणाम किरकोळ बाजारात अधिक तीव्रतेने जाणवत आहे. त्यामुळे ग्राहकांना कांदा चाळीस-पंचेचाळीस रुपये किलो दराने खरेदी करण्याची वेळ आली आहे. सणासुदीच्या काळात कांदा, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्यास सर्वसामान्यांच्या खर्चात आणखी भर पडणार आहे. कांद्याच्या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी आवक वाढविणे आवश्यक असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यानंतरच दर काही प्रमाणात स्थिर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत मात्र कांद्याने गृहिणींच्या डोळ्यातील अश्रू थांबवायचे की आणखी वाढवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.







