| उरण । वार्ताहर ।
नगरपरिषद कालावधी संपला तेव्हापासून उरण नगर परिषदेचा कारभार हा प्रशासकाच्या माध्यमातून सुरू आहे. उरण नगरपरिषदेची निवडणूक लढवून सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून पाऊल ठेवण्यासाठी शहरातील अनेक जण इच्छुक आहेत. काही मातब्बर उमेदवार पुन्हा नशीब आजमावण्याच्या तयारीत असून काही नवीन इच्छुकांनी मागील काही दिवसापासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीची मुदत संपण्याच्या अगोदर पासून काही इच्छुकांनी येणार्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. याकरिता विविध कार्यक्रम कार्यक्रमांकरिता देणग्या, मतदारांना देवदर्शन व समुद्र दर्शन सुरु केले होते. मात्र निवडणुका जसजशा लांबणीवर पडू लागल्या तसतसा इच्छुकांनी हात आखडता घेतला आहे. मतदार राजा देखील त्यामुळे थंडावला असून पुन्हा कामाधंद्याला लागल्याचे पहायला मिळत आहे.