कडलास ग्रामस्थ उतरले रस्त्यावर
| कोळा | प्रतिनिधी |
सांगोला येथील सांगोला कडलास रोड नदी पुलाजवळील बरेच वर्षे रखडलेल्या रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने व याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने सदरच्या रखडलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता समस्त कडलास ग्रामस्थ यांच्यावतीने शनिवारी (दि.1) भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कडलास ग्रामस्थांसह डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी स्वत: रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
याप्रसंगी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी करत संबंधित विभागाच्या कामकाजाविषयी तीव्र संताप व्यक्त केला. त्यावेळी संबंधित विभागाच्या संबंधित अधिकार्यांनी 15 जूनपर्यंत रस्त्याचे काम करु, असे लेखी दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. सदर रास्ता रोकोप्रसंगी दत्ताभाऊ टापरे, दत्ताभाऊ जाधव, सरपंच दिगंबर भजनावळे, शेतकरी सहकारी सूतगिरणीचे व्हा. चेअरमन अॅड. नितीन गव्हाणे, समाधान पवार, राहुल गायकवाड, संभाजी साळुंखे, संजय गायकवाड, पांडुरंग भजनावळे, अशोक ठोकळे, केशव गायकवाड, ताजू इनामदार यांच्यासह कडलास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.