सांगोला पोलिसात गुन्हा दाखल
| सांगोला | प्रतिनिधी |
चिंचोली, ता. सांगोला येथील जमिनीची बोगस व बनावट कागदपत्रे सादर करून दस्त केल्याप्रकरणी सांगोला पोलिसात तिघांजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दि. 13 जानेवारी रोजी अपर्णा शरद गुरव (दुय्यम निबंधक, सांगोला) यांनी प्रज्योत प्रभाकर चांदणे, शिलादेवी प्रभाकर चांदणे दोघे रा. एखतपूर, ता. सांगोला, लोकमंगल मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी सोलापूरतर्फे रिअल इस्टेट इनचार्ज नाजमीन आयुब शेख, रा. संतोषनगर, बाळे- सोलापूर यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी ह्या दुय्यम निबंधक कार्यालय, सांगोला येथे दुय्यम निबंधक म्हणून नेमणुकीस आहेत. सांगोला कार्यालयात मुळ अर्जदार नामे रोहित रामकृष्ण जाधव रा. पटवर्धन कुरोली, ता. पंढरपूर यांनी मौज चिंचोली, ता. सांगोला येथील जमीन गट नं. 145/3 या मिळकतीमध्ये कार्यालयीन गोडाऊनसाठी असलेले बांधकाम क्षेत्र 291.81 चौ. मी. असे संपूर्ण मिळकत ही लोकमंगल मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी लि. सोलापूर यांच्या मालकी हक्काची इमारत बांधकाम असताना शासनाचा मुद्रांक शुल्क बुडविण्याच्या हेतूने स्वार्थपोटी बनावट कागदपत्रे तयार करून दस्त क्र. 2869/2023 हा अस्तित्वात आणला असल्याचा तक्रारी अर्ज केला होता.
तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने यापुर्वीचे अधिकारी यांनी अर्जदार, गैरअर्जदार व संबंधित लोकांना नोंदणी अधिनियम 1908 मधील कलम 82 च्या कारवाई अंतर्गत नोटीस काढलेली होती, त्यानंतर फिर्यादी दुय्यम निबंधक यांनी दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी प्रज्योत प्रभाकर चांदणे, शिलादेवी प्रभाकर चांदणे, लोकमंगल मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी, तलाठी कुमाररवी राजवाडे, रोहित जाधव यांना नोटीस काढून त्यांचे म्हणणे घेतले.
त्यानंतर मुळ अर्ज, त्यातील अर्जदार व संबंधीत इसमांचे आलेले म्हणणे, दस्ताची प्रत इत्यादी सर्व कागदपत्रे त्याची पडताळणी करीत असताना, तलाठी राजवाडे यांनी दिलेले म्हणणे पाहिले असता, सदर खरेदीपत्रासोबत दाखल असलेला गावकामगार तलाठी यांचा दाखला त्यावरील सही व शिक्का हा संबंधित तलाठी यांचा नसल्याचे लेखी म्हणणे कार्यालयात कळविले.
सर्व बाबींचा कागदपत्राचे अवलोकन केले असता सदरचे खरेदीदस्त क्र. 2869/2023 हा बोगस व बनावट कागदपत्राचा आधार घेऊन बनविलेला आहे, असे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने, सदर तिघांजणा विरोधात कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याने कलम 82 खालील कारवाईव्यतिरिक्त कायदेशीर फिर्याद दाखल केली असल्याचे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.