राजकीय वरदहस्तामुळे व्यावसायिकाचा प्रताप
| नेरळ | संतोष पेरणे |
कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्टा हिरवागार करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाली भूतीवली धरणाच्या पाण्याची मागणी स्थानिक शेतकरी करीत आहेत. मात्र, शेतकर्यांना धरणाचे पाणी मिळण्याची शक्यता धूसर होऊ लागली आहे. धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्यासाठी जो मुख्य कालवा बांधण्यात आला आहे, त्या कालव्याच्या काही भागावर एका बांधकाम व्यावसायिक याने बुलडोझर फिरविला आहे. दरम्यान, धरणाच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यास मनाई असताना राजकीय वरदहस्त असल्याने धरणाच्या भिंतीजवळ खोदकाम सुरु आहे. त्याचवेळी त्या राजकीय वरदहस्त यांच्यामुळे शासकीय यंत्रणादेखील घाबरून असल्याने नोटीस देण्याशिवाय कोणतीही कारवाई सरकारी यंत्रणा करीत नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे पाली भूतीवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिळण्याची शक्यता कमी आहे.
कर्जत नेरळ रेल्वे पट्ट्यातील जमीन ओलिताखाली यावी आणि परिसरात बाराही महिने हिरवागार राहावा यासाठी पाली भूतीवली लघुपाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आला. या धरणातील पाणी परिसरातील 20 गावांतील शेतकर्यांच्या 1100 हेक्टर जमिनीवर दुबार शेती करण्यासाठी दिले जाणार होते. त्यासाठी धरणाचा मुख्य कालवा काही वर्षांपूर्वी खोदण्यात आला होता. धरणाच्या खाली असलेल्या नाल्यावर पूल बांधून त्या पुलावरून पाणी मुख्य कालव्यातून उजवा आणि डावा तीर असे सोडण्याचे नियोजन होते. त्यात मुख्य कालव्याचे एक किलोमीटर लांबीचे कामदेखील पूर्ण झाले आहे. मात्र, तोच मुख्य कालवा धारांच्या सांडव्याच्या बाजूला बांधकाम साईट विकसित करीत असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने बुजवून टाकला आहे. शासनाच्या माध्यमातून बांधण्यात आलेला कालवा बांधकाम व्यावसायिक बुलडोझर लावून बुजवून टाकतो आणि पाटबंधारे विभाग नोटिसा देण्याशिवाय काहीही करीत नसल्याचे चित्र आहे.
आमच्या विभागाच्या माध्यमातून खोदण्यात आलेला कालवा बुजवून त्यावर मातीचा भराव टाकून त्याचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे अधिकार्यांच्या पाहणीत निदर्शनास आले. त्याबाबत आमच्या विभागाने संबंधितांना नोटीस पाठवून कालवा पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एस.डी. शिंदे,
उपअभियंता, लघुपाटबंधारे विभाग, कर्जत
आम्ही शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून सर्व शेतकर्यांच्या आणि ग्रामपंचायती यांच्याकडून ठराव घेत आहोत. मात्र, शासन तिकडे बनविलेल्या कालवा बुजविणार्यावर कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे शेतकर्यांना पाणी देण्याचा सरकारचा विचार आहे की नाही, हेच आम्हला कळत नाही.
सचिन गायकवाड,
शेतकरी