अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाखांची मदत
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
आरोग्यविषयी जनजागृती, प्रोत्साहन देणे, माता व बालआरोग्य या विविध कामांच्या जबाबदार्या यशस्वीरीत्या पार पाडणार्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. सेवा बजावताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत शासनाने जाहीर केली आहे. आरोग्ययंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन निर्माण करण्याच्यादृष्टीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत.
आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बालआरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादी कारणांसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्यकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करणे अशा प्रकारची कर्तव्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना बजवावी लागत असतात. 1 एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार असल्यामुळे आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात 1 हजार आशासेविका कार्यरत
रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात 1 हजार 200 आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. तर, 100 गटप्रवर्तक कार्यरत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. शासनाने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना होणार आहे.