दुलीप ट्रॉफीत आकाश चमकला
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतात सध्या दुलीप ट्रॉफी ही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पहिल्या फेरीत भारत ‘अ’ विरुद्ध भारत ‘ब’ संघात सामना होत आहे. या सामन्यात ‘अ’ संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप चमकला आहे. त्याने या संपूर्ण सामन्यात 9 बळी घेतले आहेत. आकाश दीपने दाखवलेल्या कामगिरीमुळे आता त्याने आगामी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे दारही ठोठावले आहे.
19 सप्टेंबरपासून भारताची बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची निवड झालेली नाही. ही निवड येत्या आठवड्यात होऊ शकते. दरम्यान, या मालिकेत भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याची शक्यता आहे. त्याला या मालिकेसाठी विश्रांती दिली जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे जर त्याला विश्रांती देण्यात आली, तर याच्या जागेवर आकाश दीपचा विचार केला जाऊ शकतो.
‘ब’ संघाने प्रथम फलंदाजी करताना 116 षटकात सर्वबाद 321 धावा केल्या होत्या. या संघाकडून मुशीर खानने सर्वाधिक 181 धावांची खेळी केली, तर नवदीप सैनीने 56 धावांची खेळी केली होती. यानंतर ‘अ’ संघाला पहिल्या डावात 72.4 षटकात सर्वबाद 231 धावा करता आल्या. यामुळे ‘ब’ संघाने 90 धावांची आघाडी घेतली होती. यानंतर दुसर्या डावात ‘ब’ संघ 42 षटकात अवघ्या 184 धावांवर सर्वबाद झाला. तसेच, 275 धावांचे लक्ष्य ‘अ’ संघासमोर ठेवता आले. तसेच, ‘अ’ संघाकडून गोलंदाजी करताना दोन्ही डावात आकाश दीप सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.
धारदार गोलंदाजी
आकाश दीपने पहिल्या डावात 27 षटकात 60 धावा खर्च करताना 4 बळी घेतले आहेत. यामध्ये त्याने ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, नवदीप सैनी आणि यश दयाल यांना बाद केले होते. यानंतर त्याने दुसर्या डावात आणखी धारदार गोलंदाजी करताना 14 षटकात 56 धावात 5 बळी घेतले आहेत. त्याने कर्णधार अभिमन्यू ईश्वरन, मुशीर खान, वॉशिंग्टन सुंदर, साई किशोर आणि नवदीप सैनी यांना बाद केले आहे. यातील वॉशिंग्टन सुंदरला तर त्याने एक सुरेख चेंडू टाकत त्रिफळाचीत केले आहे.