श्रीकृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रंगला आषाढी एकादशीचा सोहळा
| चौल | प्रतिनिधी |
आषाढी एकादशीचे औचित्य साधत रेवदंडा येथील श्रीकृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शुक्रवारी (दि. 24) विठ्ठलभक्तीचा अनोखा सोहळा रंगला. वारकरी वेशातील चिमुकले, विठ्ठल-रुक्मिणीच्या आकर्षक वेशभूषा, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मुखी अखंड विठ्ठलनाम अशा भक्तिमय वातावरणात शाळा अक्षरशः पंढरीमय झाली होती. विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा आणि आषाढी एकादशीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना, विद्यार्थ्यांनाही या समृद्ध परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने श्रीकृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विठ्ठलनामाचा गजर करत वातावरण भक्तिरसाने भारून टाकले. याप्रसंगी शाळेची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग सादर करण्यात आले, तर चिमुकल्या वारकऱ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडीचा अनुभव साकारला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थित पालक आणि शिक्षकही भारावून गेले.
मुख्याध्यापिका रिया झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी फेर धरून, फुगड्या खेळून आणि विठ्ठलनामाचा गजर करत आनंदोत्सव साजरा केला. भगवा ध्वज, तुळशी वृंदावन आणि भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण शाळा परिसर विठ्ठलमय झाला होता. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वारी, दिंडी आणि संत परंपरेचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका रिया झावरे, शिक्षिका प्रीती म्हात्रे, निधी गुप्ता, सुचित्रा देव, अंकिता नाईक, श्वेता म्हात्रे तसेच संगीता गोंधळी, संपदा मानकर आणि माधुरी चुनेकर यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे पालकांनीही मनापासून कौतुक केले.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे, तर आपल्या संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचीही ओळख व्हावी हा या उपक्रमामागील उद्देश होता. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये भक्ती, संस्कार आणि भारतीय परंपरेबद्दल आत्मीयता निर्माण होते.
रिया झावरे,
मुख्याध्यापिका, श्रीकृपा इंग्लिश मीडियम स्कूल
