| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आषाढी एकादशीचे औचित्य साधून अलिबागमधील श्रीकृपा प्रतिष्ठानच्यावतीने “अभंगवाणी” या भक्तिसंगीताच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि.25) सायंकाळी 6.00 वाजता अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात होणार आहे. तसेच, सर्व रसिकांसाठी तो विनामूल्य खुला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. संतोष पवार यांनी दिली.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने अलिबागमध्ये प्रथमच अशा स्वरूपाचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर आपल्या गायनाने स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या कलाकारांचे सादरीकरण ऐकण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने अलिबागकरांना मिळणार आहे. आषाढी एकादशीचा भक्तिमय उत्सव अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी तसेच संतांच्या अभंगांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा, संतवाङ्मय आणि अभंगांच्या माध्यमातून भक्तिरसाची अनुभूती देणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. धनंजय जोशी आणि शास्त्रीय गायिका कस्तुरी देशपांडे-मांजरेकर अभंग व भक्तिगीतांचा सुरेल नजराणा सादर करणार आहेत. यावेळी श्रीराम ठोसर हे निरूपण करणार असून, आदित्य पानवलकर (तबला), निनाद जोशी (संवादिनी), सूरज गोंधळी (पखवाज), प्रणव दांडेकर (तालवाद्य) आणि तेजस गोविलकर (बासरी) हे कलाकार साथसंगत करणार आहेत.







