। मुंबई । प्रतिनिधी ।
अशोक मंडळाने रणझुंजार संघ आयोजित कुमार गट कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. शिवनेरी सेवा मंडळाचा यश राक्षे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. चिंचपोकळी (पूर्व) येथील स्व. सुरेश आचरेकर मैदानावर संपन्न झालेल्या कुमार गटाच्या अंतिम सामन्यात अशोक मंडळाने मध्यांतरातील 15-20 अशा पिछाडीवरून शिवनेरी मंडळाचा 46-26 असा पराभव करीत स्व. मानसी हरीश घाडी चषक व रोख रु.पाच हजार (5,000/-) ची कमाई केली. उपविजेत्या शिवनेरीला स्व. सुषमा दत्तात्रय परब चषक व रोख रु. तीन हजार (3,000/-) वर समाधान मानावे लागले.
सूरज सुतारचा अष्टपैलू खेळ त्याला संतोष ठाकूर, ओमकार कामतेकर यांची मिळालेली चढाईची आणि शशांक मोकल, विघ्नेश पाटील यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे अशोक मंडळाने आपला हा विजय मोठ्या फरकाने साकारला. यश राक्षे, जतीन शिंदे, अजय गुरव यांना पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात दाखविता आला नाही. याअगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अशोक मंडळाने श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाचा 49-34 असा तर शिवनेरी सेवा मंडळाने विजय बजरंगचा 68-39 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य पराभूत दोन्ही संघांना प्रत्येकी रोख रु. दोन हजार (2,000/-) व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाचा तुषार शिंदेला स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा, अशोक मंडळाच्या शशांक मोकलला उत्कृष्ट पकडीचा, तर विजय बजरंगच्या शुभम शिंदेला लक्षवेधी खेळाडू म्हणून आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.