सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कोठींबे-जामरुंग रस्त्यावरील एक किलोमिटर लांबीचा रस्ता भर पावसात डांबरीकरण करण्यात येत होता. याबाबतचे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने संबंधित ठेकेदाराला पावसाचा जोर कमी झाल्यावर रस्त्यावरील डांबरीकरण करण्याचे आदेश नव्याने दिले आहेत. मात्र, भर पावसात करण्यात आलेले हे डांबरीकरण दोन दिवसांनी धुवून निघाले असल्याचे स्पष्ट दिसत आहेत.
तालुक्यातील कशेले भागातील कोठिंबेपासून पुढे जामरुंग-आंबिवली रस्त्याचे कार्पेट डांबरीकरण करण्याचे काम अर्थ संकल्पात मंजूर झाले आहे. या रस्त्यातील गावे असलेल्या ठिकाणी काँक्रीटीकरण आणि अन्य रस्त्यावर कार्पेट डांबरीकरण केले जाणार आहे. उन्हाचा प्रभाव हा मे महिन्यात जास्त असतो. परंतु, मे महिन्यात कधीही अवकाळी पाऊस होऊ शकतो. त्यामुळे राज्यात कुठेही 15 मे नंतर डांबरीकरण करण्यावर निर्बंध आहेत. मात्र, कर्जत तालुक्यातील कोठिंबे-आंबिवली-जामरुंग रस्त्यावर मंजूर असलेले डांबरीकरण ठेका मिळविणाऱ्या ठेकेदाराने 18 मे रोजी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशी या भागात प्रचंड प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू होता. परंतु, निधी लाटण्यासाठी ठेकेदाराने सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा विचार न करता डांबरीकरण काम सुरू केले आणि तब्बल एक किलोमिटर पेक्षा अधिक लांबीचा रस्ता डांबरीकरण केला.
या रस्त्याची दोन दिवसांनी पाहणी केली असताना कोठिंबे-आंबिवली भागातील आनंदवाडी-खानंद भागातील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची दयनीय अवस्था झाली आहे. आनंद वाडी फाटा भागातून कशेले कडे येणाऱ्या रस्त्यावरील डांबरी थर पावसाच्या पाण्यात निघून गेला आहे. या डांबरीकरण कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.त्यामुळे 15 मे नंतर डांबरीकरण करण्याची परवानगी देणाऱ्या बांधकाम खात्याला देखील जाब विचारण्याची गरज आहे.