| नवीन पनवेल | वार्ताहर |
नितळस, नवपाडा येथे नवीन घराचे बांधकाम करत असल्याचा राग मनात धरून राजेश कातकरी यांना नितळस ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे पती आणि ग्रामपंचायत सदस्याने जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी या दोघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितळस गाव, नवपाडा येथील राजेश दशरथ कातकरी हे घराजवळ असलेल्या नवपाडा येथील मोकळ्या जागेत घर बांधत होते. यावेळी त्यांच्या गावातील सरपंच यांचे पती शरद पावशे व ग्रामपंचायत सदस्य कैलास मढवी यांनी त्याला घर बांधण्यासाठी विरोध केला होता. शरद पावशे याने रस्त्याकरिता जागा कमी का सोडली, जास्त जागा सोड, नाही तर काम बंद करायचे असे बोलून शिवीगाळ केली व मारून टाकेन, अशी दमदाटी व जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर कैलास मढवी याने राजेश यांना नितळस ग्रामपंचायत कार्यालयात बोलावले व काम ताबडतोब बंद कर नाहीतर मारून टाकेन, असे बोलून जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केली. त्यामुळे शरद पावशे आणि कैलास मढवी यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.