। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल रेल्वे स्थानकात बसलेल्या एका अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार करून लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रेल्वे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. माथेरान येथे राहणारा शंकर पाटील (16) हा भाऊ दशरथ पाटील (20) याच्यासोबत पनवेलमध्ये आला होता. त्यानंतर दशरथ हा घोडा खरेदीचा व्यवहार करण्यासाठी नेरुळला गेला असता, शंकर रेल्वे स्थानकातच त्याची वाट पाहात बसलेला होता. शंकर हा शर्यतीचे घोडे चालविण्याचे काम करत असून, खरेदी केलेला नवीन घोडा तो घेऊन जाणार होता, परंतु तो स्थानकात बसून असतानाच, तिथे आलेल्या दोन तरुणांनी त्याच्याकडील बॅग व मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. शंकर याने त्यांना प्रतिकार केला असता, दोघांपैकी एकाने त्याच्याकडील धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करून मोबाइल व बॅग लुटून पळ काढला. हे दोघेही स्थानकातून सुटलेल्या लोकलमध्ये चढून दुसर्या बाजूला उतरून पळाले. जखमी झालेल्या शंकर याने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर घडलेल्या घटनेची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.