| नेरळ | प्रतिनीधी |
शहापूर येथे दरोडे टाकून पसार झालेल्या दरोडेखोर याला शहापूर पोलिसांनी नेरळ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. दरोडे आणि चोरी यांच्या अनेक केसेस नावावर असलेला हा तरुण शहापूर भागातून चोर्या करून पळून जाण्याचा तयारीत असताना नेरळ येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी कल्याणपासून त्या चोरट्यांचे नातेवाईक यांचा पाठलाग करून नेरळ येथे आल्यावर नेरळ पोलिसांच्या मदतीने तात्काळ ताब्यात घेतले.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील पोलीस ठाण्यात अट्टल दरोडेखोर म्हणून नोंद असलेला तरुण आपल्या आई, पत्नी, मुलांसह नेरळजवळ भाड्याची खोली खरेदी करण्यासाठी आला होता. शहापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हामधील चोरी गुन्ह्यातील आरोपी कवर सिंग काळू सिंग टाक हा फरार झाला होता. शहापूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक या आरोपीचे मागावर होते. शहापूर पोलीस ठाण्याचे पथकही तेथील पोलीस निरीक्षक हितेंद्र ठाकूर, सहायक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव यांचे मार्गदर्शन घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार शशिकांत पाटील, पोलीस नाईक विकास सानप, पोलीस शिपाई रमेश नलावडे, मोहन भोईर हे कल्याण येथून कंवर सिंग ठाक याच्या नातेवाईक आई, पत्नी आणि लहान मुले हे कल्याण येथून स्थानकात होते. त्यावेळी कर्जतकडे येणार्या गाडीमध्ये ते लोक बसल्यावर शहापूर पोलीसदेखील लोकलमध्ये चढले. नेरळ स्थानकात ते लोक कंवर सिंग ठाक याचे नातेवाईक उतरल्यावर पोलिसांनी त्यांच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला.
दरोडेखोर कंवर सिंग ठाक याचे नातेवाईक हे नेरळजवळील मोहाची वाडीपासून पुढे असलेल्या कोमल वाडी येथे पोहोचले. तेथे चाळीमधील खोली भाड्याने घेऊन राहण्याच्या तयारीत कंवर सिंग ठाक शहापूर पोलिसांना दिसून आला. त्यावेळी काही पोलिसांनी लगेच नेरळ पोलीस ठाणे गाठले आणि नेरळ पोलिसांना घेऊन कोमल वाडी गाठली. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे, पोलीस हवालदार दत्तात्रय किसवे, पोलीस शिपाई निलेश कुंभरे, महिला प्रियांका घोरपडे यांची मदत घेऊन कोमल वाडी येथे कोंबिंग ऑपरेशन केले. कंवर सिंग टाक हा पोलिसांना बघून पळून जाऊ लागला. त्यावेळी पोलिसांनी झडप घालून त्या दरोडेखोरास ताब्यात घेतले. कंवर सिंग ठाक याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरी, घरफोडी करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. नेरळ पोलीस ठाण्यात आरोपीबद्दल माहिती नोंद करून त्या दरोडेखोर यास शहापूर येथे नेण्यात आले.