| माणगांव | प्रतिनिधी |
पतीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन पत्नीस माणगाव न्यायालयाने आरोपीस सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ही घटना पोलादपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दि. 05 एप्रिल 2015 रोजी सकाळी 10.15 वाजता मौजे कापडे गावच्या हद्दीत सदरील घटना घडली होती. पुजा ही अजित परमेश्वर वर्मा याची पत्नी आहे. आपल्या पतीचे अन्य इतर मुलींशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरुन त्यांच्याच भांडण होत असे. यावरुन अजितने पत्नीला शांत करण्याचे उद्देशाने त्याचे घरांतील स्टोव्ह मधील रॉकेल अंगावर ओतुन घेतले होते.
याचवेळी पुजाने अजितच्या अंगावर पेटती काडी टाकून आग लावून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.बी. पाटील ठाणे यांनी केला. सदरचे दोषारोप पत्र जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केले. सदर खटत्याची सुनावणी अति सत्र न्यायालय, माणगाव रायगड येथे झाली. गुन्हयात फिर्यादी, वैद्यकिय अधिकारी व निवासी तहसिलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. सदर खटल्यामध्ये अति शासकीय अभियोक्ता जितेंद्र म्हात्रे माणगाव रायगड यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले सुनावणी दरम्यान तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यु.एल. घुमास्कर, छाया कोपनर, शशिकांत कासार, शशिकांत गोविलकर, सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले. सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी आरोपी पुजा अजित वर्मा यांस दोषी ठरवून 7 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.