औषध पाजून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

पतीविरोधात गुन्हा दाखल

| पनवेल | वार्ताहर |

पत्नीला औषध पाजून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती नागेश वीरप्पा सुतार, रा. नांदगाव याच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतीक्षा राठोड या नांदगाव येथील चाळीमध्ये राहात असून, त्यांच्या पतीसोबत त्यांचे नेहमी भांडण होत असे. त्यानुसार त्या आयजीपीएल कंपनी तळोजा येथून कामावरून संध्याकाळी घरी आल्यानंतर पती नागेश यांच्यासोबत त्यांचे भांडण होऊन पतीने त्यांना मारहाण केली. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पुन्हा तिचे पती कंपनीजवळ आले आणि त्यावेळेस नांदगाव येथे राहण्यास चल, तुला घटस्फोट द्यायचा नाही, असे तो बोलला. याबाबत पत्नीने नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने तिचे केस पकडून तिला मारण्यास सुरुवात केली व त्यानंतर जबरदस्तीने गाडीवर बसवून पनवेल येथील मिरची गल्ली बाजारपेठ येथे आणले आणि एका दुकानातून पांढर्‍या रंगाची बाटली घेतली आणि गाडीवर बसवून पत्नीला नांदगाव डोंगरावर घेऊन गेला. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू होते. दरम्यान, आत्महत्येच्या हेतूने विकत घेतलेल्या बाटलीमधील औषध पिऊन दोघेही मरून जाऊ असे पतीने पत्नीला सांगितले असता, त्याला प्रतीक्षा हिने नकार दिला आणि तेथून ती निघून जात असताना पतीने तिचे केस पकडून तिला जबरदस्तीने औषध पाजले. मात्र, प्रतीक्षा ही तोंडातील औषध थुंकून पळू लागली. त्यावेळेस पुन्हा तिला पतीने पकडून तिला औषध पाजले. यानंतर पत्नी प्रतीक्षा हिला त्रास होऊ लागल्याने पतीनेच तिला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेले. त्यानंतर एमजीएम हॉस्पिटल वाशी येथे प्रथमोपचार करून एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे तिला आणण्यात आले. यानंतर पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version