अनधिकृत बांधकाम हटविण्यास टाळाटाळ

सेवानिवृत्त अधिकारी उपोषणाला बसणार
। महाड । वार्ताहर ।
महाड शहरातील चवदार तळे परिसरात नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून, एका इमारत मालकाने केलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात 1 जुलै पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा एका सेवानिवृत्त राजपत्रित अधिकार्‍याने दिला आहे. तशी नोटीस या अधिकार्‍याने महाड नगरपालिका प्रशासनाला दिली आहे.

सेवानिवृत्त गटविकास अधिकारी रमेश गुजर यांनी ही नोटीस दिली आहे. चवदार तळे येथील एका इमारत मालकाने नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. याबाबत गुजर यांनी नगरपालिकेकडे तक्रारही केली होती. मात्र, या तक्रारीकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यानंतर गुजर यांनी लोकशाही दिनामध्ये तक्रार केली. त्यावेळेस नगरपालिकेच्या अधिकार्यांनी हे बांधकाम अनधिकृत असल्याचे मान्य देखील केले. त्यावर हे बांधकाम पाडून टाकण्याचे आदेश तहसिलदारांनी महाड नगरपालिकेला दिले. मात्र, त्यानंतरही नगरपालिका प्रशासनाने हे बांधकाम पाडण्याची कारवाई केली नाही.

नगरपालिका प्रशासनाकडून या इमारत मालकाला पाठिशी घालण्यात येत असल्याने, रमेश गुजर यांनी 1 जुलै पासून महाड नगरपालिका कार्यालयासमोर आमरा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. नगरपालिकेबरोबरच महाड प्रांताधिकारी आणि महाड शहर पोलीस ठाण्याला देखील त्यांनी या नोटीसीची प्रत पाठविली आहे.

Exit mobile version