धोका वाढतोय! ‘या’ वेळेत प्रवास करणे टाळा

। मुरुड/ जंजिरा । वार्ताहर ।
रायगडात दोन चार तालुके वगळता सर्व तालुक्यांतून पारा 40 सेल्सियस वर पोहचला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्‍वभूमीवर हवामान खाते, जिल्हा प्रशासन, डॉक्टरांनी देखील यापासून बचाव करण्यासाठी दुपारच्या वेळी बाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहेत. समुद्रकिनारे देखील या अतिउष्णतेने गरम झाल्याचे जाणवत आहेत. दक्षिण रायगडात तर दुपारी मोटार सायकलवरून रोहा, इंदापूर, माणगाव, महाड, पोलादपूर मार्गावरून प्रवास देखील करणे अवघड बनले आहे. आधिक माहिती घेता खालापूर, पाली-सुधागड आदी तालुक्यात उष्णतेची भट्टी लागलेली असून तापमान 40 सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. चारचाकी वाहनात वातानुकूलित यंत्रणा नसेल तर हालत बिघडून जात आहे. माणगाव तालुक्यातील पारा 41 वर पोहचल्याची माहिती तेथील नागरिक समीर मांढरे यांनी दिली.

वैशाख वणव्याने रायगड तापला
चैत्र संपत असतानाच वैशाख वणव्याच्या झळाही आणखी तीव्र होऊ लागल्या आहेत. दररोज आग ओकणार्‍या सूर्यनारायणामुळे बुधवारी रायगड जिल्हा भट्टीप्रमाणे तापल्याने पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. कर्जत तालुका सर्वाधिक 42 सेल्सियसवर पोहचल्याने अनेकांना उष्णतेचा मोठा त्रास जाणवला आहे. बुधवारी मुरूड, अलिबाग, श्रीवर्धन या समुद्र किनारपट्टीवरील तालुक्यात तापमान पारा 39 वर पोहचला होता. दक्षिण रायगडात 41 वर तापमान पोहचले असून अनेकांनी बाहेर पडणे बंद केले आहे.दुपारच्यावेळी तर बाजारपेठांमध्ये कमालीचा शुकशुकाट जाणवत असतो. भट्टीप्रमाणे उष्णतेचे चटके बसू लागले आहेत.तापमानात कमी- जास्त असा चढ-उतार होत असून आजारी व्यक्तींना मोठा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. तापमान अति वाढल्याने दुपारी बाजारपेठेतुन शुकशुकाट दिसून येत आहे.

थंडगार पदार्थ सेवन करा
रायगडात दोन चार तालुके वगळता सर्व तालुक्यांतून पारा 40 सेल्सियस वर पोहचला आहे.अशा वेळी सफेद सुती कपडे वापरावे, शहाळी, सबज्जा, वाळा सरबत, लिंबू सरबत, ताटगोळे , आवळा सरबत आदी शरीर प्रकृती थंड ठेवणारे पेयांचे सेवन करावे, असे बुजुर्ग मंडळींनी सुचविले आहे.आजारी माणसांची खूप काळजी घ्यावी लागणार आहे.अवकाळी पावसाचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.सध्या उन्हाची वाढती काहिली ही चिंतेची बाब बनली आहे.तापमान आधिक वाढल्यास उष्माघाताचे संकट ओढवू शकते.एकूणच ’संकट पे संकट’अशी रायगडातील परिस्थिती बनली आहे.

दुपारचे जाहीर कार्यक्रम रद्द
वाढत्या उष्म्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात आता 30 मे पर्यंत दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कुठलेही जाहीर कार्यक्रम ठेवण्यास सरकारने बंदी घातली आहे.गेल्याच आठवड्यात खारघर येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने आदेश दिल्याचे मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Exit mobile version