दोनशेहून अधिकांचे अर्ज प्रलंबित
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्यांना विनंती बदलीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सुमारे दोनशेहून अधिक कर्मचार्यांचे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती समोर येत आहे. या कर्मचार्यांच्या बदल्या कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
रायगड पोलीस दलात पोलीस अधीक्षक यांच्या अधिपत्याखाली आठ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, 28 पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण, सायबर गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, वाचक शाखा, असे अनेक विभाग कार्यरत आहेत. जिल्ह्यात सुमारे दोन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखणे, पोलीस बंदोबस्त ठेवणे, व्हीआयपी दौरा सांभाळणे, मोर्चे, आंदोलन, उपोषणाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवणे, चोरी, घरफोडीसारख्या अनेक गुन्ह्यांची उकल करणे, रात्रीचा दिवस करून गस्त घालणे, सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करणे, वेगवेगळ्या उपक्रमांतून जनतेपर्यंत पोहोचून कायद्याचे महत्त्व पटवून देणे, अशा अनेक प्रकारची कामे पोलीस करतात. सणासुदीच्या काळात पहारा ठेवणे अशी अनेक कर्तव्य बजावत असताना पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांना वेळ देता येत नाही. पोलीस ठाणे अथवा अन्य विभागात काही वर्षे काम केल्यावर कुटुंबियांना वेळ देण्यासाठी घरापासून जवळच असलेले पोलीस ठाणे, कार्यालयाची मागणी काही पोलीस कर्मचारी करतात. त्यासाठी विनंती बदली केली जाते.
रायगड पोलीस दलातील दोनशेहून अधिक पोलीस कर्मचार्यांनी विनंती बदलीची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्यांची अद्याप बदली झाली नाही. विनंत्या बदल्या वेळेवर होत नसल्याने कर्मचार्यांचीदेखील प्रचंड गैरसोय होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे कर्तव्याला महत्त्व देत असताना कर्मचार्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी कायमच प्रयत्नशील राहिले आहेत. त्यामुळे विनंती बदल्यांची प्रक्रिया लवकरच पूर्ण करतील, अशी अपेक्षा कर्मचार्यांकडून व्यक्त केली जात आहे.