| पाताळगंगा | वार्ताहर |
मागील आठवड्यापासून पावसाने मौन धारण केल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. पावसाने हजेरी लावली, मात्र भातपिकावर खोडकिडा तसेच सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तालुका कृषी अधिकारी आणि कोकण कृषी विद्यापीठ दापोली कृषी शास्त्रज्ञ डॉ. जीवन आरेकर यांनी आपटी व तळवली या गावात जाऊन भातपिकांची पाहणी करुन खोडकिड्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी शास्त्रज्ञांनी अशा पिकावर पडलेल्या रोगांवर औषध फवारणी करुन आपण पिकांचे रक्षण करु शकतो, यामुळे पिके वाचली जात असून, उत्पादनावर काहीही परिणाम होत नाही. यामुळे कृषी खात्याच्या माध्यमातून येणाऱ्या सूचनेचे पालन करुन आपली पिके वाचविण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, तालुका कृषी अधिकारी खालापूर सुनील निंबाळकर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले, की शास्त्रज्ञांनी केलेल्या शिफारशीप्रमाणे सुरळीतील अळी व पिवळा खोडकिड्याचे नियंत्रण करावे, तसेच भातशेतीवर आलेला खोडकिडा पाहणी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी नितीन महाडिक, कृषी पर्यवेक्षक सुरेश उघडा, कृषी सहाय्यक आर.बी. आंधळे तसेच शेतकरी उपस्थित होते.