पथनाट्यांना पर्यटकांचा जोरदार प्रतिसाद
। रायगड । प्रतिनिधी ।
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे विभागीय कार्यालयामार्फत स्थानिक जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र तसेच प्रिझम सामाजिक विकास संघटना यांचे सहकार्याने रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मतदार जनजागृती आणि सहभाग कार्यक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, नायब तहसिलदार अजित तोलकर आणि अलिबाग येथील राज्य परिवहन महामंडळाचे आगार व्यवस्थापक अजय वनारसे, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रसिद्धी सहायक पी. कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. अलिबाग हे कोकणातील लोकप्रिय असे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून याठिकाणी पर्यटक विरंगुळ्याचे क्षण घालवण्यासाठी दररोज दाखल होतात. विशेषतः शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी अलिबाग परिसर हा पर्यटकांच्या गर्दीने फुललेला असतो. या बाबी विचारात घेता पर्यटकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरोमार्फत अलिबाग समुद्रकिनारा आणि अलिबाग बस स्टँड परिसर येथे शनिवारी (दि.4) आणि रविवारी (दि.5) असे दोन दिवस स्वीपसंदर्भात कार्यक्रम राबवण्यात आले. याप्रसंगी रायगड येथील स्वयंमसिद्ध सामाजिक विकास संस्थेने सादर केलेल्या पथनाट्यांना पर्यटक आणि मतदार यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला.