रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य
| तळा | प्रतिनिधी |
तळा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून या रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांसह व्यावसायिक आणि दुचाकी, चारचाकी वाहन चालक कमालीचे हैराण झाले आहेत.
रस्ता तयार झाला त्याच्या काही महिन्यांनीच तत्कालीन ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या रस्त्यावर खड्डे पडले होते. पावसाळ्यात या रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य होऊन रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. त्यानंतर बऱ्याच काळापासून या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नसल्याने या रस्त्याची अक्षरशः चालण झाली आहे.
शहरातील हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र, महाविद्यालय, जिल्हा परिषद शाळा तसेच फोंडळवाडी, मेठ मोहल्ला, मुंढ्याचीवाडी, भोईरवाडी यांसारख्या वाड्या असल्याने या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, महिला, शासकीय कर्मचारी तसेच नागरिकांची वर्दळ असते. परंतु या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे तसेच उखडलेल्या खडीमुळे रस्त्याची दैना उडाली आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार, मणक्याचे आजार, तसेच वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.