नगरपंचायत प्रशासनाला दुरुस्तीचा विसर
| तळा | वार्ताहर |
तळा शहराच्या प्रवेशद्वारावर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता दुरुस्ती करण्याचा तळा नगरपंचायत प्रशासनाला विसर पडला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तळा शहराच्या प्रवेशद्वारावर माझी वसुंधरा अभियान अंतर्गत झाडे लावून सुशोभिकरण करण्यात आले आहे. या झाडांना पाणी पुरवठा करण्यासाठी सदर रस्ता खोदून पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र, या झाडांना नियमित पाणी मिळत नसल्याने ते पूर्णतः सुकून गेली आहेत. शिवाय, पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेला रस्त्याची डागडुजी करण्यात आली नसल्याने दिवसेंदिवस हा रस्ता उखडून त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, या रस्त्याची मोठमोठी डबर उखडून बाहेर पडल्याने रस्त्यावरून प्रवास करणार्या वाहनांचे टायर फुटून अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शहराचा हा मुख्य प्रवेशद्वार असल्याने या रस्त्यावरून दिवसभर वाहनांची वर्दळ असते. पावसाळा तोंडावर आल्याने पावसाळ्यात रस्त्याची आणखी दुरवस्था होऊन अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, तसेच या ठिकाणी याआधी बरेचशे अपघातदेखील घडले आहेत. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर रस्त्याची त्वरित डागडुजी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
