रायगडला अवकाळीचा तडाखा

अनेक घरांचे नुकसान, पिकांची नासाडी

| नेरळ/पाली/पोलादपूर | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 13) तुफान वादळवारा आणि अवकाळी पावसाचा रुद्रावतार पहावयास मिळाला. सुधागड, पाली, महाड, पोलादपूर, नेरळ, कर्जतमधील अनेक गावांतील घरांना मोठा फटका बसला. शेतमालाची नासाडी झाली असून, दुबार शेतीचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सुधागड तालुक्यात मुसळधार वादळी पावसामुळे मोठी हानी झाली. येथील वावे गावात सर्वाधिक 53 घरांचे नुकसान झाले आहे. व एक वृद्ध महिला जखमी झाली. तसेच मजरे जांभुळपाडा येथील तीन घरांचे नुकसान झाले आहे. याबरोबरच मुळशी ठाकूरवाडी, दहिगाव, वावे तर्फे आसरे, माणगाव बुद्रुक, करचुंडे येथे देखील घरांचे कौल आणि पत्रे फुटल्याची माहिती समोर आली आहे.

अंगणवाडीचे नुकसान
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमध्ये वावे गाव असून या गावात काल आलेल्या वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले.तेथील ग्रामस्थांच्या घरांचे किरकोळ नुकसान झाले असून त्या गावातील अंगणवाडी केंद्राचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.अंगणवाडी केंद्रावर बसवलेली नवीन लोखंडी पत्रे वादळात उडून गेली आहेत.तर त्या खाली बसवण्यात आलेले फायबर सीलिंग कोसळून देखील मोठे नुकसान झाले आहे.
उन्हाळी शेती पाण्याखाली
कर्जत तालुक्यात सतत चार दिवस सुरू असलेल्या अवकाळी आणि गारपीट पावसाने दुबार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असून, भाताची बहरलेली शेती अवकाळी पावसाच्या विळख्यात सापडली आहे. दरम्यान, तालुक्यातील मार्केवाडी, धुळे वाडी आणि भोईर वाडी येथील शेतकऱ्यांचे शेकडो एकर जमिनीवर भात पावसात भिजत आहे. कर्जत तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी भाताची शेती केली जाते. टाटा येथील वीजनिर्मिती केलेले पाणी नंतर राजानालामधून भाताच्या शेतीसाठी सोडले जाते.त्या पाण्यावर कर्जत तालुक्यातील 40 गावांमधील शेतकरी भाताची शेती करतात.उन्हाळी भाताची शेती बहरली असून, सध्या भाताची शेतीचा कापणी हंगाम सुरू आहे. या काळात अनेक शेतकऱ्यांनी मजूर घेऊन भाताचे पीक कापून ठेवले आहे, तर काही शेतकऱ्यांच्या शेतात भाताचे पीक आजही उभे आहे. या दोन्ही पिकांची मागील सलग चार दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः वाट लावली आहे.
आंबापिकाचे मोठे नुकसान
पोलादपूर तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने प्रचंड हानी पोहोचवली आहे. तालुक्यातील 450 हून अधिक हेक्टर क्षेत्रातील आंबा बागायतीपैकी अंदाजे 2000 शेतकरी खातेदारांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. अवकाळी पावसाने आंबा बागांमध्ये कच्च्या आंब्यांचा सडा पाडल्याने या कैऱ्या लोणचे उत्पादक कंपन्यांना अल्पदरात विकण्याखेरिज आंबा बागायतदारांना गत्यंतर नसल्याचे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकार सरसकट आंबा लागवडीवर नुकसान भरपाई देईल काय, असा सवालही कोंढवी येथील आंबा उत्पादक शेतकरी बाळाराम मोरे यांनी शासनाला केला आहे.
Exit mobile version