| अलिबाग | प्रतिनिधी |
मशागतीची कामे संपली असून शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवातदेखील केली आहे. मात्र, जूनचा पहीला आठवडा संपत आला, तरी पाऊस काही बरसला नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा असून पाऊस कधी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 98 हजारहून अधिक हेक्टर क्षेत्रामध्ये भात लागवड केली जाते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बांधबंदिस्ती व इतर शेतावरील कामे पुर्ण केली आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयापासून काही शेतकऱ्यांनी वाफे पेरणीला सुरुवात केली आहे. जिल्हयात अनेक भागांमध्ये भात पेरणीची लगबग सुरु असून लागणारे बियाणे खरेदीसाठीदेखील दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. मात्र, जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला, तरीदेखील पावसाने अजूनपर्यंत हजेरी लावली नाही. कडक उन्हामुळे पेरणी केलेले बियाणे वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून राहिले आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून हवामान खात्याकडून पाऊस पडण्याच्या इशारा दिला जात आहे. काही ठिकाणी रिमझीम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, अद्यापर्यंत पावसाने हजेरी लावली नाही. आठ तारखेनंतर पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाऊस लवकरात लवकर पडावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बळीराजाचे डोळे लागले आकाशाकडे
