पावसाळी पर्यटनावरील बंदी उठवावी; मनसेची मागणी

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुका पर्यटन तालुका म्हणून विकसित होत आहे. त्यात पावसाळी पर्यटनासाठी पावसाळ्यात दररोज हजारो पर्यटक येथील निसर्गसंपदेचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. मात्र अपघातामुळे जिल्हा प्रशासनाने कर्जत तालुक्यातील पाणवठे 9 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी जाण्यास बंद केले आहेत. दरम्यान, शासनाच्या या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कर्जतचे प्रांत अधिकारी यांची भेट घेऊन जमावबंदी आदेश हटविण्याची मागणी केली आहे. 

पावसाळी पर्यटनासाठी कर्जत तालुक्यात दररोज हजारो पर्यटक येत असतात. त्या पर्यटकांच्या आगमनामुळे कर्जत तालुक्यातील शेकडो व्यावसायिक यांना रोजगार मिळत असतो आणि त्यामुळे अनेक कुटुंब वर्षा पर्यटनावर अवलंबून असतात. मात्र असे असताना देखील प्रशासनाने सलग चौथ्या वर्षी कर्जत तालुक्यातील धरणे बंधारे,धबधबे याठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे. त्याचवेळी पर्यटनासाठी येणारे पर्यटक यांना जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून कलम 144 लागू करण्यात आल्याने स्थानिकांच्या व्यवसाय ठप्प झाले आहेत. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्जत चे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले.त्यावेळी मनसेच्या वतीने जमावबंदी आणि कलम 144 हटविण्याची मागणी केली आहे.

कर्जत तालुक्यातील पर्यटन परिसरात लावण्यात आलेले कलम 144 तात्काळ हटविण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सदर विषयात जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा शब्द प्रांताधिकारी नैराळे यांनी दिला. मनसेचे तालुकाध्यक्ष महेंद्र निगुडकर तसेच तालुका सचिव अक्षय महाले, तालुका उपाध्यक्ष यशवंत भवारे, दिनेश बोराडे, कर्जत शहराध्यक्ष  समिर चव्हाण, कर्जत शहर सचिव चिन्मय बडेकर तसेच सतीश कालेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version