जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्याच्या अफवा पसरत असताना, संभाव्य गैरप्रकार आणि अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील कोणत्याही पेट्रोल पंपावरून पेट्रोल किंवा डिझेल खुलेपणाने म्हणजेच प्लास्टिक बाटली, कॅन, डबा किंवा इतर कोणत्याही अनधिकृत कंटेनरमध्ये विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
पेट्रोलियम नियम 2002 नुसार, इंधनाची विक्री केवळ वाहनांच्या टाकीतच करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, सर्व पेट्रोल पंप चालक आणि मालकांनी आपल्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणे आणि इंधन विक्रीची नोंद नियमितपणे अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अनधिकृतरित्या पेट्रोल किंवा डिझेल साठवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला असून, पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पेट्रोलियम नियम 2002, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय सार्वजनिक हित आणि सुरक्षेला प्राधान्य देत घेतल्याचे सांगितले आहे.






