खारघरमधून बांग्लादेशी नागरिकास अटक

| पनवेल | वार्ताहर |

खारघर परिसरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी नागरिकाला शनिवारी (दि.11) खारघर पोलिसांनी अटक केली. गौस हक्कामिया शेख (31) असे त्याचे नाव असून तो मागील अनेक वर्षांपासून खारघरमध्ये बेकायदा वास्तव्यास असल्याचे चौकशीत आढळून आले.

खारघर सेक्टर-34 मधील मॅजिस्टेट व्हिला इमारतीत बांग्लादेशी नागरिक विनापासपोर्टशिवाय राहत असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गस्तीवर असलेले पोलिस हवालदार संजय मोरे व पोलिस शिपाई माच्छिंद्र पाटील यांनी शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मॅजिस्टेट व्हिला इमारतीत गौस हक्कामिया शेख हा बांग्लादेशी नागरिक विनापासपोर्ट तसेच वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याने बांग्लादेशातील दारिद्य्राला कंटाळून घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे कबुल केले. तसेच तो खारघरमध्ये मागील अनेक वर्षांपासून बेकायदा वास्तव्यास असल्याचेही कबुल केले. त्यानुसार पोलिसांनी शेख याच्या विरोधात पारपत्र अधिनियम तसेच विदेशी व्यक्ती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Exit mobile version