| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण टक्केवारीत स्वतंत्रपणे समावेश करण्यात यावे, या मागणीसाठी बंजारा समाजामार्फत शुक्रवारी (दि.10) दुपारी मोर्चा काढण्यात आला. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल बंजारा समाज एकवटला. एसटी आरक्षण देण्यात यावा असा एकच नारा करीत या मोर्चाची सुरुवात कामगार नाका येथून करण्यात आली. या मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
सेवालाल महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चाला सुुरूवात दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. अलिबागमधील सेवालाल महाराज नाका कामगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बालाजी नाका, मारुती नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघाला. सकल बंजारा आरक्षण समिती रायगड जिल्हा यांच्या वतीने आयोजित मोर्चाला हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील हिराकोट तलावाजवळ आल्यावर मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले. यावेळी वेगवेगळ्या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रकाश राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. मागण्यांची दखल न घेतल्यास भव्य मोर्चा काढून सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडू असा इशारा मोर्चेकरांनी यावेळी दिला.







