यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

बांधकाम विभागाच्या काराभाराबाबत नागरिकांमध्ये संताप

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचे काम करण्याचा दिखावा मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. काँक्रिटीकरणासह डांबरीकरण करण्यासाठी मशिनरीदेखील आणण्यात आल्या. मात्र, नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे ठेकेदारांचा कारभार असल्याचे उघड झाले. या मार्गावरील वावे-सुडकोली रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे गणरायाचे आगमन यंदाही खड्ड्यांतून होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.

अलिबाग-रोहा-साईपर्यंतचा 85 किलोमीटरचा रस्ता बांधा, वापरा व हस्तांतरित करा या योजनेंतर्गत मंजूर करण्यात आला होता. पावणे दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. गुजरातमधील एका कंपनीला या रस्त्याचा ठेका देण्यात आला. रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन आठ वेळा करण्यात आले. त्यामध्ये भाजप आणि शिंदे गटामध्ये श्रेयवादही पेटले होते. अखेर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. मात्र, आजही अलिबाग तालुक्यातील वावे ते सुडकोली मार्गावरील रस्ता खड्ड्यात असल्याचे चित्र आहे. फणसापूर, सुडकोली, नवघर या ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. चिखलाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. खडतर आणि जीवघेण्या प्रवासाला सामोरे जाण्याची वेळ या मार्गावरील प्रवाशांवर आली आहे.

शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने 2018-2019च्या दरम्यान हा रस्ता मंजूर करण्यात आला होता. मात्र, शेतकरी कामगार पक्षाला त्याचा फायदा होईल, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी या कामाची वर्क ऑर्डर थांबवली. त्यानंतर पावसाळ्यात पुन्हा वर्क ऑर्डर काढण्यात आली. बांधा, वापरा हस्तांतरित करा या योजनेंतर्गत होणाऱ्या कामांची देखभाल दुरुस्ती ठेकेदाराने दहा वर्षे करण्याचा नियम आहे. मात्र, ज्या कंपनीला ठेका दिला होता, त्या कंपनीचा ठेकेदार पळून गेला. त्यानंतर दुसरी एजन्सीची निवड करून काम देण्यात आले. त्या कंपनीकडूनही अद्याप कामाची कोणतीही प्रगती दिसून आली नसल्याचे उघड झाले आहे.

अलिबाग तालुक्यातील वावेपासून सुडकोलीपर्यंतच्या रस्त्याला भगदाड पडले आहे. काही ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहे. तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. बाप्पाचे आगमन आता काही दिवसांत घरोघरी होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यांतूनच होणार आहे. नियम धाब्यावर बसवून करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे वास्तव समोर आले आहे. या रस्त्याच्या कामाची निविदा पुन्हा काढली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारामुळे या मार्गावरील प्रवाशांना खड्डेमुक्त रस्त्याची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चर्चा सुरु आहे.

ठेकेदार मालामाल करण्याचा घाट
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचे काम गुजरातमधील कंपनीला दिले आहे. त्या कंपनीला बदलून नव्याने निविदा काढून कामे केली जाणार असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत दोन ठेकेदार निवडले आहेत. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना होत असून, ठेकेदार मालामाल करण्याचा घाट या विभागाने सुरु केल्याची चर्चा रंगत आहे.
कार्यकारी अभियंत्यांना गांभीर्य नाही!
अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाबाबत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मोनिका खाडे यांना संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलण्याची तसदी घेतली नाही. जनतेच्या प्रश्नाला उत्तर देण्यास बांधील असताना, फोन न उचलल्याने त्यांना या रस्त्याबाबत काहीच गांभीर्य नाही, अशी संतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Exit mobile version