प्रवासी वर्गाकडून नाराजीचे सुर
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. त्याचा फटका अलिबाग-सुडकोली मार्गावरील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे कंबरेचे आजार होण्याबरोबरच धुळीमुळे श्वसनाचे आजारदेखील जाणवू लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कारभाराबाबत प्रवासी वर्गाकडून नाराजीचे सुर उमटत आहेत.
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या चार वर्षापूर्वी मंजूर झाले. या रस्त्याला प्रत्यक्षात कामाला सुरुवात गेल्या वर्षापासून झाली. हा रस्ता एका वर्षात पूर्ण होईल अशी अशा प्रवाशांना होती. रुंदीकरण, डांबरीकरण व मजबूतीकरण या अंतर्गत रस्त्याचे काम केले जाणार आहे. सुमारे 12 किलो मीटरअंतरावर सिमेंट काँक्रीटीकरणदेखील आहे. अलिबाग तालुक्यातील वेळवली खानाव ते एचपी कंपनीपर्यंत सिमेंट काँक्रीटचे काम सुरु करण्यात आले. मात्र, ते काम अपूर्ण राहिल्याने रस्त्याची एक बाजू खड्डेमय झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनू लागले आहे. अपूर्ण काँक्रीटीकरणामुळे येथील प्रवासी त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मातीचा भराव घालण्यात आला आहे. या भरावामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वेळवली खानाव ते उसरपर्यंत ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
या रस्त्याच्या कामासाठी अनेकवेळा बेलकडे येथून नारळ वाढविण्यात आले. परंतु प्रत्यक्षात कामाला कोणतीही गती दिसून येत नसल्याची प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कामाबाबत नागरिकांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहेत.
अलिबाग- रोहा मार्गावरील रस्त्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत 40 टक्के काम पुर्ण झाले आहे. सध्या रोहा येथून कामाला सुरुवात आहे. रुंदीकरण, डांबरीकरण व मजबूतीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे लवकरच या रस्त्याचे काम पुर्ण होईल.
के. ई. सुखदेवे, कार्यकारी अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग